महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ नोव्हेंबर ।। ज्यांना पवार फार्मवरील पाडव्याला यायचे होते, ते इकडे आले. ज्यांना गोविंदबागेत जायचे होते ते तिकडे गेले. काहींनी दोन्हीकडे हजेरी लावली. कार्यकर्त्यांना लवकर घरी जाता यावे, त्यांचा वेळ वाचावा, यासाठी मी गोविंदबागेत गेलो नाही, असा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि.२) येथे केला.
बारामतीत यंदा प्रथमच पवार कुटुंबांकडून दोन दिवाळी पाडव्यांचे आयोजन केले गेले. गेल्या अनेक वर्षांची परंपरा पक्ष फुटीनंतर खंडित झाली. यासंबंधी अजित पवार म्हणाले, पूर्वी काटेवाडीतच हा कार्यक्रम होत होता. त्यानंतर गोविंदबागेत हा कार्यक्रम होवू लागला. बारामतीतील कार्यकर्त्यांना सोयीचे पडते म्हणून तेच ठिकाण दरवर्षी ठेवले गेले.
आज उत्साहाने अनेक मान्यवरांनी, जनतेने शुभेच्छा दिल्या. ज्यांना मला भेटायचे होते ते भेटले. त्यांना साहेबांना भेटायचे होते, ते गोविंदबागेत गेले. काही लोक दोन्हीकडेही भेटून गेले. त्यामुळे गर्दी विभागली गेली. कार्यकर्त्यांनाही लवकर घरी जाता यावे, यासाठी मी गोविंद बागेत गेलो नाही. काटेवाडीतच पाडवा साजरा केला, असे पवार यांनी सांगितले.