गणेशोत्सव: मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा; चाकरमानी अडकले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – सिंधुदुर्ग – ता. २ ऑगस्ट – गणेशोत्सावासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आज पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण टोलनाका आणि कशेडी घाटात वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याने या महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दोन ते तीन किलोमीटर पर्यंत या रांगा लागल्याने चाकरमान्यांना रस्त्यातच अडकून पडावे लागले आहे.

कोकणातील अनेक गावांनी मुंबई, ठाणे आणि पुण्यातून येणाऱ्या चाकरमान्यांना १४ दिवस क्वॉरंटाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ७ ऑगस्टच्या आत कोकणात पोहोचण्याच्या हिशोबाने चाकरमानी कोकणाकडे निघाले आहे. करोनाची लागण होऊ नये म्हणून चाकरमान्यांनी खासगी वाहनांनी कोकणात जाण्यावर भर दिला आहे. त्यामुळे कालपासून मुंबई-गोवा महामार्गावर अचानक वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. त्यातच खारेपाटण टोलनाक्यावर वाहनांना थांबवून प्रत्येकाची अँटिजेन टेस्ट करण्यात येत आहे. ज्यांच्या टेस्ट निगेटिव्ह येत आहेत, त्यांना पुढे प्रवास करण्यास मुभा देण्यात येत आहे. तर ज्यांच्या टेस्ट पॉसिटीव्ह येत आहेत त्यांना जवळच्या क्वॉरंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात येत आहे. टोलनाक्यावर वाहने थांबवून प्रत्येकाची अँटिजेन टेस्ट करण्यात येत असल्याने त्यात तास-दीड तास जात असल्याने वाहनांचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे खारेपाटण टोलनाका येथे चिपळून जवळ कालपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या परिसरात दोन ते तीन किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. त्यातच पावसाच्या अधूनमधून सरी पडत असल्याने चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. शिवाय करोनामुळे परिसरात एकही हॉटेल किंवा ढाबा उघडा नसल्यानेही चाकरमान्यांना चहापाणी मिळणेही मुश्किल झाले आहे.


हीच परिस्थिती कशेडी घाटातही पाह्यला मिळत आहे. कशेडी घाटातही वाहनांची संख्या वाढल्याने या ठिकाणीही वाहतुकीचीही मोठी कोंडी झाली आहे. कशेडी घाटातही दोन ते तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मुंबई-ठाण्यातून ७-८ तास प्रवास करून आल्यानंतर चार चार तास वाहतूक कोंडीत अडकावे लागत असल्याने चाकरमानी प्रचंड वैतागले आहेत. दरम्यान, गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात आतपर्यंत दीड लाख चाकरमानी दाखल झाले आहेत. अजून एक ते दीड लाख चाकरमानी कोकणात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *