वारंवार लॉकडाऊन वाढवला तर आर्थिक संकट वाढेल : गडकरी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – नवीदिल्ली – ता. २ ऑगस्ट – करोनाचं संकट मोठं असलं तरी लॉकडाऊन वाढवणं हा त्यावर आता पर्याय होऊ शकत नाही. वारंवार लॉकडाऊन वाढवला तर आर्थिक संकट वाढेल. करोनापेक्षाही हे मोठं संकट असेल. बेरोजगारी वाढेल आणि लोक आत्महत्या करू लागतील, अशी भीती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. देशातील जनतेला आता करोनाबरोबरच जगावं लागणार असून त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या सूचनांचं पालन केलंच पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

करोनाचं संकट जागतिक संकट आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी प्रत्येक देशाने लॉकडाऊन सुरू केला. परिस्थितीनुसार लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय योग्य की अयोग्य हा वाद निरर्थक आहे, असं सांगतानाच आता शंभर टक्के लॉकडाऊन करणं योग्य नाही. त्यातून आर्थिक संकट वाढलं तर ते करोनापेक्षाही मोठं असेल. त्यामुळे त्यातून लोक बेरोजगार होतील आणि आत्महत्या वाढतील. त्यातून वेगळीच समस्या निर्माण होईल. त्यामुळे लॉकडाऊन वाढवणं हा आता पर्याय होऊ शकत नाही, हे माझं वैयक्तिक मत आहे. अर्थात सरकारला निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. देशाच्या हिताच्या दृष्टीनेच सरकार निर्णय घेत असते, असं नितीन गडकरी म्हणाले. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही भूमिका मांडली.

करोनाची लस येईपर्यंत आपल्याला जीवही जपावा लागणार आहे आणि संकटातूनही बाहेर पडावे लागणार आहे. अमूक गोष्ट केल्याने करोना जाईल असं कुणीही ठामपणे सांगू शकत नाही. तसं सांगणारा एकही नेता किंवा माणूस नाही. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत खबरदारी घेऊनच आपल्याला पुढे जावं लागणार आहे. राजकारण न करता संकटातून मार्गक्रमण करावं लागणार आहे, असं सांगतानाच लॉकडाऊन वाढवणं योग्य नसलं तरी रस्त्यावर, बाजारात किंवा कुठेही गर्दी करणं योग्य नाही. केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या सूचनांचं पालन केलं पाहिजे. तोंडाला मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं आणि सॅनिटाझेशन करणं या गोष्टी पाळाव्याच लागणार असल्याचं गडकरी म्हणाले. तसेच गरीबाांना मदत करणार नाही असं कोणत्याही सरकारनं कधी म्हटलेलं नाही. कोणतंही सरकार असं म्हणून शकत नाही. पण मदतीला मर्यादा असतात. मदतीवर कोणीही दीर्घकाळ जगू शकत नाही. करोनाच्या सूचना पाळूनच त्यातून मार्गक्रमण करावं लागणार असल्याचंही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *