‘भिकार संपादक’ उल्लेख करत संजय राऊतांवर संतापले राज ठाकरे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ नोव्हेंबर ।। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी विक्रोळीत घेतलेल्या जाहीर सभेमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते तसेच प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. राऊत यांचा थेट उल्लेख न करता राज यांनी, ‘भिकार संपादक’ असा उल्लेख करत टोला लगावला. संजय राऊत हे भांडूपमध्ये राहतात आणि विक्रोळी मतदारसंघातच हा भाग येतो. राज ठाकरेंनी राऊत यांच्यावर निशाणा साधताना जाहीर भाषणात आपण ठाकरे असून तोंड आपल्यालाही आहे असं म्हणत एक अपशब्दही वापरला.

‘भिकार संपादक’ असा उल्लेख
“काही जागा आणणार म्हणजे आणणार कुठल्याही परिस्थितीत निवडून आणणार. कोणाला काय करायचं असेल ते करुन घ्यावं,” असं म्हणत राज ठाकरेंनी विक्रोळीमध्ये जिंकायचंच असा निर्धार भाषणाच्या सुरुवातीलाच व्यक्त केला. “कोणी दादागिरीची भाषा करत असेल तर दुप्पट दादगिरीने उतरेन. मी हे तुमच्या टाळ्यांसाठी म्हणत नाहीये. समोरच्या एकदा आजमाववंच! या संपूर्ण अख्खी भाषा घाणेरडी करुन टाकणारा एक ‘भिकार संपादक’ इकडे राहतो. त्याला वाटतं तोंड त्यालाच दिलंय. इथे आम्ही ठाकरे आहोत. आमचा जेनेटीक प्रॉब्लेम आहे. त्यांना वाटतं शिव्या त्यांच्याकडे आहे. ते शोले म्हणजे होतं ना तुम दो मारो हम चार मारेंगे,” असं म्हणत राज यांनी थेट उल्लेख न करता राऊतांना आव्हान दिलं.

भावी पिढीला वाटतं हेच राजकारण
“घाण करुन टाकलं सगळं राजकारण! सकाळी उठायचं, यांना (प्रसारमाध्यमांना) धरायचं. यांनाही काही काम धंदे नाही सकाळी सकाळी जाऊन बसतात. प्रश्न कोण आणि काय बोलल्याचा नाहीये. कोण काय बोलतंय, किती खालच्या स्तराला जाऊन बोलतंय याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये. हे जेव्हा दाखवतात तेव्हा जी येणारी लहान लहान मुलं आहेत, ज्या मुली राजकारणात येऊ पाहतात त्यांना वाटतं हेच राजकारण! असा समज व्हायला लागला तर या महाराष्ट्राचं राजकारण किती घाणेरडं आणि गचाळ होऊन किती वाट लागेल महाराष्ट्राची याची आपण कल्पना तरी करतोय का?” असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

संयम बाळगतो याचा अर्थ…
“कसलाही मागचा पुढचा विचार नाही. सकाळी उठायचं आणि वाटेल ते बडबडत बसायचं आणि बोलत बसायचं. याला वाटतं आमच्याकडे तोंड नाहीयेत. आमचं जर तोंड सुटलं ना… त्यांना कल्पना आहे या गोष्टींची. संयम बाळगतो याचा अर्थ XX समजू नये यांनी,” असंही राज राऊतांना इशारा देताना म्हणाले.

बदला घ्ययाचा आहे
“सगळा महाराष्ट्राचा विचका करुन टाकलाय. राजकारणाचं व्याकरण बिघडवून टाकलं आहे. कोण कुठे कशाला काय चाललं आहे कसला पत्ताच लागत नाही. मागची पाच वर्ष आठवून बघा. पाच वर्षात काय काय गोष्टी झाल्या. आपण दिलेलं मत सध्या कुठे-कुठे फिरतंय काही कळतंय का तुम्हाला? बरेच विषय माझ्या सभांमध्ये येऊन गेलेत. कारण मी वारंवार ते सांगणार कारण जे महाराष्ट्रात मागील पाच वर्षात घडलं ते यापूर्वी इतिहासात कधीच घडलं नव्हतं. महाराष्ट्राच्या झालेल्या या अपमानाचा बदला घ्ययाचा आहे तुम्हाला या 20 तारखेला,” असं राज यांनी उपस्थितांना सांगितलं.

विक्रोळीत पुन्हा सभा घेणार
“हा मतदारसंघ हायवेने तोडला आहे, अर्धा इथे अर्धा तिथे! आज इथे सभा आहे. मला मुंबईला गेल्यानंतर पुढचं सभांचं शेड्यूल कळेल. पुढे मला कसं मॅनेज होईल पाहतो पण विक्रोळीत आणखीन एक सभा होईल,” असंही राज यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *