महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ नोव्हेंबर ।। राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये राज्यातील अनेक ठिकाणी चूरस दिसून येत आहे. यापैकीच एक मतदारसंघ म्हणजे पुण्यातील वडगावशेरी! या ठिकाणी अजित पवारांच्या पक्षाकडून विद्यमान आमदार सुनील टिंगरेना उमेदवारी देण्यात आली आहे तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीने बापू पठारे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. काही महिन्यांपूर्वी याच मतदारसंघातील कल्याणी नगरमध्ये झालेल्या पोर्शे कारच्या अपघाताशी आमदार सुनील टिंगरेंचं नाव जोडलं जात आहे. या प्रकरणामध्ये त्यांची पोलीस चौकशीही झाली आहे. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी सभेत उघडपणे टीका करत टिंगरेंचा उल्लेख ‘दिवटा आमदार’ असा केला होता. मात्र आता यावरुनच शरद पवारांना नोटीस पाठवण्याचा इशारा टिंगरेंनी दिल्यानंतर या इशाऱ्यावर शरद पवारांच्या कन्या तसेच बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलं आहे.
…तर तुमच्या नोटिशीला काय घाबरणार?
‘कल्याणी नगरच्या पोर्शे कार अपघात प्रकरणी नाव घेऊन बदनामी केली तर कोर्टात खेचीन,’ अशी नोटीस आमदार सुनील टिंगरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठवली आहे. या नोटिशीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी टिंगरेंना टोला लगावला. येरवडा इथं वडगावशेरी मतदारसंघाचे उमेदवार बापू पठारे यांच्यासाठी शुक्रवारी महाविकास आघाडीआची सभा पार पडली. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणातून जोरदार टीका केली. “ज्या शरद पवारांनी मागील निवडणुकीत एबी फॉर्मवर सही करून सुनील टिंगरे यांच्या हातात फॉर्म दिला. त्यांनीच आज पवार साहेबांना नोटीस पाठवली आहे. हिम्मत असेल तर त्यांना न्यायालयात खेचूनच दाखवा. शरद पवार हे ईडीच्या नोटिशीला घाबरले नाहीत, तर तुमच्या नोटिशीला काय घाबरणार?” अशा शब्दांत सुप्रिया सुळेंना टिंगरेंना टोला लगावला.