महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० नोव्हेंबर ।। “राजकारणातून मी अजिबात निवृत्त होणार नाही. संसदीय कामकाज करण्याऐवजी मी पक्ष संघटनेचे काम करणार आहे. राजकारणात एक नवी पिढी तयार करायची आहे. महाराष्ट्राच्या हिताचे पुढील पाच – ५० वर्षांचे नियोजन करेल,” असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले.
भाजपबरोबर गेलेल्यांची विचारसरणी वेगळी आहे. त्यामुळे त्यांना सोबत घेण्याचा प्रश्नच येत नसल्याची भूमिका त्यांनी अजित पवार यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मांडली. नागपूर येथे एका वृत्तवाहिनीशी बोलताना पवार म्हणाले, “या विधानसभा निवडणुकीत तरुण पिढीला पुढे आणण्याच्या दृष्टीनेच उमेदवारी दिली आहे. यात
तासगाव येथून दिवंगत आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील, आमच्या कुटुंबातील उच्च शिक्षित युगेंद्र पवार, रोहित पवार असे तरुण राजकारणात आले आहेत. पुढील काळात देखील तरुण पिढीला राजकारणात संधी देण्यासाठी नियोजन केले जाईल.”
पवार म्हणाले, “लोकसभा निवडणुकीच्या राजकारणातून थांबण्याचा निर्णय २०१४ मध्ये घेतला. त्यानंतर राज्यसभेवर प्रतिनिधित्व करत आहे. राज्यसभेची अजून दोन वर्षे बाकी आहेत. त्यानंतर काय करायचे याचा विचार करत आहे. संसदीय राजकारणापेक्षा आता संघटनात्मक आणि पक्षीय
राजकारणाकडे लक्ष दिले जाईल.” लोकांमध्ये गेलो नाही, त्यांच्यासोबत चर्चा केली नाही तर मला झोप येणार नाही. त्यामुळे संघटनात्मक राजकारणात सक्रिय राहणार असल्याचे सांगत एक प्रकारे राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त होण्याच्या चर्चाना त्यांनी पूर्णविराम दिला.
राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे, यात अजिबात शंका नाही. या सरकारमध्ये ज्या पक्षाच्या सर्वाधिक जागा निवडून येतील, त्या पक्षाला मुख्यमंत्रिपद द्यावे, अशी आमची भूमिका असल्याचे व त्यास पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले