महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० नोव्हेंबर ।। भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने १३ सदस्यीय संघाची घोषणा केली. पर्थमधील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या सलामीच्या सामन्यात नॅथन मॅकस्विनी ( Nathan McSweeney) कसोटी पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. पण, निवड समितीने १३ खेळाडूंच्या संघात जोश इंग्लिसचा ( Josh Inglis ) समावेश करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. इंग्लिस जो आज पर्थ येथे पाकिस्तान विरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद भूषवणार आहे. इंग्लिसला यापूर्वी राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांनी सलामीचा फलंदाज म्हणून नाकारले होते. तरीही त्याला संधी दिल्याने टीका होण्याची शक्यता आहे.
भारत अ विरुद्धच्या नुकत्याच झालेल्या सामन्यात २५ वर्षीय मॅकस्विनीने प्रथमच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ओपनिंग केली आणि त्याला १४ व २५ धावा करता आल्या. मॅकस्विनी अनुभवी फलंदाज उस्मान ख्वाजासोबत कसोटीत सलामीला खेळण्याचा अंदाज आहे. भारताविरुद्धची पहिली कसोटी २२ नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि त्यानंतर ॲडलेड आणि ब्रिस्बेनमध्ये सामने होतील. मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे कसोटी आणि सिडनीमध्ये नवीन वर्षाची कसोटी होईल. सहा शतकांसह मॅकस्विनीची प्रथम श्रेणीतील सरासरी ३८.१६ आहे.
डेव्हिड वॉर्नरच्या निवृत्तीनंतर मॅकस्विनीकडे त्याची रिप्लेसमेंट म्हणून पाहिले जात आहे. मार्कस हॅरिस आणि कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट यांना डावलून मॅकस्विनीला प्राधान्य दिले गेले आहे. माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने वर्षाच्या सुरुवातीला सलामीवीर म्हणून काही सामने खेळले होते. पण, तो पुन्हा त्याच्या चौथ्या क्रमांकाच्या पसंतीच्या स्थानावर परतला आहे, मार्नस लाबुशेन तिसऱ्या क्रमांकावर खेळेल.
कर्णधार पॅट कमिन्सने डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क, वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड व स्कॉट बोलँड आणि ऑफस्पिनर नॅथन लियॉनसह ऑस्ट्रेलियाची गोलंदाजांची फळी मजबूत दिसत आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी भारताला या मालिकेत ४-० असा विजय मिळवावा लागणार आहे.
पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी ( यष्टिरक्षक ), जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, नॅथन मॅकस्वीनी, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क.
भारताचा १८ सदस्यीय संघ – रोहित शर्मा ( कर्णधार), जसप्रीत बुमराह ( उप कर्णधार), आर अश्विन, मोहम्मद शमी, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, रवींद्र जडेजा, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, सर्फराज खान, विराट कोहली, प्रसिद्ध कृष्णा, ऋषभ पंत, लोकेश राहुल, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर.