महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० नोव्हेंबर ।। दिवाळीच्या मुहूर्तावर दराचा उच्चांक नोंदविलेल्या सोने- चांदीच्या दरात मागील 10 दिवसांत सातत्याने चढ-उतार बघावयास मिळत आहे. 10 दिवसांत सोन दोन हजार, तर चांदी तब्बल सात हजारांनी स्वस्त झाली असून, लग्नसराईपूर्वी दर कमी होत असल्याने यंदा कर्तव्य असलेल्या यजमानांना काहीसा दिलासा मिळाला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प निवडून येताच दरात घसरण होत असल्याचे बोलले जात आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर घडत असलेल्या घडामोडींचा सोने-चांदीच्या दरावर सातत्याने परिणाम होत आहे. वास्तविक, गेल्या अर्थसंकल्पात सोने- चांदीवरील आयात शुल्कात मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली होती. मात्र, ही कपात दरवाढ रोखू शकली नाही. ऐन दसरा, दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्याने उच्चांकी ८० हजारांचा टप्पा पार केल्याने ग्राहकांनीही सोने खरेदी करताना हात आखडता घेतला होता. चांदीदेखील विक्रमी एक लाखाच्या पार गेल्याने आणखी किती दरवाढ होणार हाच प्रश्न ग्राहकांच्या मुखी होता. दरम्यान, दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर (१ नोव्हेंबर) सोने दर २४ कॅरेट प्रतितोळा ८० हजार ५९० रुपये इतका नोंदविला गेला, तर चांदी ९७ हजार प्रतिकिलो होती. तत्पूर्वी ३१ ऑक्टोबर रोजी चांदीने एक लाख रुपये किलो हा दर नोंदविला होता. भाऊबीज आणि पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात किंचित चढ-उतार बघावयास मिळाली, तर चांदीचे दर स्थिर होते. त्यानंतर मात्र, सातत्याने सोन्याबरोबर चांदीच्या दरात घसरण बघावयास मिळत आहे. गुरुवारी (दि. ७) २४ कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा ७८ हजार ५९० रुपये इतका नोंदविला गेला. म्हणजेच अवघ्या सात दिवसांत सोन्याचे दर दोन हजारांनी, तर चांदीचा दर तब्बल सात हजारांनी घसरत ९३ हजारांवर पोहोचला होता. आगामी काळातील लग्नसराईचा विचार करता, सोने-चांदीच्या दरात होत असलेली घसरण दिलासा देणारी ठरण्याची शक्यता आहे. मात्र, दर घसरणीला ‘ट्रम्प इफेक्ट’ असल्याचे बाेलले जात असून, हा इफेक्ट किती काळ बाजारावर राहणार? हा मात्र प्रश्न आहे.
शनिवारी दरात किंचित वाढ
गुरुवारी (दि. ७) सोने- चांदीच्या दरात कमालीची घसरण बघावयास मिळाली असली तरी, शनिवारी (दि. ९) त्यात किंचित वाढ झाल्याचे दिसून आले. शनिवारी २४ कॅरेट सोन्याच्या दरात ८०० रुपयांची वाढ होत हा दर प्रतितोळा ७९ हजार ३९० वर पोहोचला. चांदीच्या दरातही एक हजार रुपयांची वाढ होऊन दर ९४ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचला.