महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ नोव्हेंबर ।। ‘‘राज्यामध्ये लागलेला निकाल अनपेक्षित आहे. छोटी राज्ये काँग्रेस व अन्य पक्षाच्या यशासाठी आणि मोठे राज्य सत्ताधाऱ्यांच्या लाभांसाठी असा काहीतरी वेगळा गमतीदार प्रयोग दिसतो. जेणेकरून कोणी हरकत घेतली, तर त्या राज्यांमध्ये तुमचे सरकार आहे, असे सांगून ते मुद्दा खोडतात,’’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी लगावला.
शरद पवार आज कऱ्हाडमध्ये मुक्कामी आहेत. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची उद्या (सोमवारी) पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त त्यांच्या समाधिस्थळास अभिवादन करण्यासाठी पवार आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पवार म्हणाले, ‘‘चार महिन्यांपूर्वी हरियाना व जम्मू काश्मीर यांच्या निवडणुका झाल्या. त्यात हरियानामध्ये भाजप आले, तर जम्मू काश्मीरमध्ये संयुक्त सत्ता आहे. झारखंड आणि महाराष्ट्र येथे तोच प्रकार दिसतो. झारखंडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे.
मात्र, महाराष्ट्रात अपयश. त्यामुळे लहानसे राज्य दुसऱ्याच्या यशासाठी आणि मोठे राज्य सत्ताधाऱ्यांच्या लाभांसाठी असा काहीतरी वेगळा गमतीदार प्रयोग दिसतो.’’ विधानसभेच्या निवडणुकीत जातीय ध्रुवीकरण झाले आहे का? या प्रश्नांवर ते म्हणाले, ‘‘साहजिकच जातीय ध्रुवीकरण झाल्याचे स्पष्ट दिसते. लोकांना उजवी विचारसरणी पटते, असे मान्य करावे लागेल. मात्र, त्यासाठी सखोल अभ्यास करून बोलता येईल.’’
पवार म्हणाले, ‘‘लाडकी बहीण योजनेबाबत महाविकास आघाडीविरोधात महायुतीने खोटा प्रचार केला. त्यामुळे महिलांनी विरोधात मतदान केले. महायुतीचे सरकार गेले, तर महाविकास आघाडी लाडकी बहीण योजना बंद करेल, असा खोटा प्रचार केल्यामुळे महिलांनी आमच्याविरोधात मतदान केले, असा काही कार्यकर्त्यांचा अहवाल आहे.
अधिकृत आकडेवारी आल्यावर त्याचा अभ्यास आणि विश्लेषण करणार आहोत. आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही. मात्र, लोकांनी दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. महाविकास आघाडीचा पराभव झाला असला तरी लोकांमध्ये जाऊन पुन्हा नव्याने उभे राहू, परत जोमाने कामाला लागणार आहोत. तळागाळात जाऊन अजून चांगले काम करणार आहोत.’’
पवार म्हणाले, ‘‘अजित पवार यांना जास्त जागा आल्या, ते मान्य करणे गैर नाही. बारामतीत उमेदवार दिला नसता तर वेगळा संदेश गेला असता. एकीकडे नवखा तर दुसरीकडे अनुभवी उमेदवार. त्यामुळे अजित पवार आणि युगेंद्र पवार यांची तुलना होऊ शकत नाही, त्यांचा पराभव मान्य आहे.’’ निकालानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर शरद पवार यांनी याबाबत अधिकृत माहिती नसल्यामुळे मी ईव्हीएम मशिनवर भाष्य करणार नाही. अधिकृत माहिती घेऊन बोलेन असे सांगितले.
मराठा आरक्षणामुळे ओबीसी समाज व ब्राह्मणांची मते महायुतीकडे गेली. त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला, याकडे कसे बघता? या प्रश्नावर पवार यांनी त्याबाबत अधिकृत अशी काही माहिती अद्याप नाही. त्याची माहिती घेऊनच त्यावर भाष्य करता येईल. मात्र, भाजपच्या ‘बटेंगे तो कटेंगे’चा काही परिणाम लोकांवर झाल्यासारखी स्थिती काही भागात निश्चित झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
पवार-चव्हाण यांच्यात चर्चा
शरद पवारांनी कऱ्हाड तालुक्यातील वेगवेगळ्या कार्यकर्त्यांशी, समर्थकांशी चर्चा केली. त्यादरम्यान पवार यांच्या भेटीला आलेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बराचवेळ बंद खोलीत चर्चा केली. सुमारे तासभर चाललेल्या या चर्चेत नक्की काय झाले? याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र, शरद पवार यांनी विधानसभेच्या निकालानंतर आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करू, असे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. त्यानुसारच माजी मुख्यमंत्री चव्हाण व ज्येष्ठ नेते पवार यांच्यात चर्चा झाली असावी, अशी चर्चा आहे.
शरद पवार म्हणाले…
मी काही घरी बसणार नाही.
विधानसभेच्या निकालामुळे मी हार मानणार नाही.
दिल्लीतील अधिवेशन झाल्यानंतर लगेच राज्यात येऊन पुन्हा जोमाने कामाला लागणार आहे. त्यासाठी आराखडा आखून दौरा करणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांसह अन्य निवडणुकांत महाविकास आघाडी म्हणून आम्ही सामोरे जाणार की नाही, त्याबाबत चर्चा झालेली नाही. निकालावर लवकरच महाविकास आघाडीची बैठक घेऊन पुढची धोरणे ठरवणार आहोत.
मुख्यमंत्री कोण होईल?
मुख्यमंत्री कोण होईल?, या प्रश्नावर पवार म्हणाले, भाजपच्या १३० जागा आहेत. त्यांच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे त्यांच्या नादाला कोणी लागेल, असे वाटत नाही. त्यामुळे पुढची रणनीती स्पष्ट आहे. २०१९ पेक्षा या निवडणुकीत मतदान दोन टक्के वाढले, ते महिलांचे होते, हे खरे आहे.’’