Weather forecast | ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ डिसेंबर ।। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘फेंगल’ चक्रीवादळ पुद्दुचेरीजवळील किनारपट्टीवर शनिवारी (दि.३०) सायंकाळी आदळले. (Cyclone Fengal) याचा परिणाम दक्षिण भारतातील तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्रप्रदेश, केरळ राज्यांत अधिक दिसून आला. ‘फेंगल’ चक्रीवादळ शांत झाले असले तरी, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांवर याचा प्रभाव दिसून येत आहे. यामुळे राज्यातील हवामानात मोठा बदल झाल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.

सिंधुदुर्ग, कोल्हापुरात पावसाची शक्‍यता

हवामान विभागाने दिलेल्या अपडेटनुसार, आजपासून (दि.२) शुक्रवारपर्यंत (दि.६) राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांत विजेच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, पुणे सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत देखील हलक्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट

कोल्हापूर, कोल्हापूरातील घाट क्षेत्र, सातारा, सांगली आणि सोलापूरमध्ये गुरूवारी (दि.५) यलो अलर्ट देण्यात आला आहे. याचबरोबर मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिवला देखील यलो अलर्ट देण्यात आल्याचे येथे विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ३० ते ४० किमी/तास राहिल, असेही भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *