महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ डिसेंबर ।। भारताविरुद्धच्या मालिकेत ०-१ अशा पिछाडीवर पडलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने एडिलेड कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हन जाहीर केली. जोश हेझलवूडने दुखापतीमुळे मालिकेतून माघार घेतल्याने ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी वाढवली होती. पण, त्याची रिप्लेसमेंट तेवढीच तगडी शोधण्यात ऑसींना यश आले आहे. कर्णधार पॅट कमिन्सने आताच झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. Rohit Sharma अँड टीमला रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाने जवळपास दीड वर्षांनी वेगवान गोलंदाजाला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी दिली आहे.
वेगवान गोलंदाज स्कॉट बोलंडचे ( Scott Boland ) जवळपास दीड वर्षानंतर ऑस्ट्रेलियन कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. कर्णधार पॅट कमिन्सने बोलंडच्या समावेशाच्या वृत्ताला पुष्टी दिली आहे आणि ॲडलेड डे-नाईट कसोटीसाठी मिच मार्शच्या गोलंदाजी करण्यासाठी फिट आहे की नाही हेही सांगितले आहे. बोलंडने मागील ॲशेस मालिकेदरम्यान शेवटची कसोटी खेळली होती. पर्थमधील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्या कसोटीत साईड स्ट्रेन झालेल्या जोश हेझलवूडची जागा त्याने घेतली .
पहिल्या कसोटीतील भारताच्या दुसऱ्या डावात मार्शला गोलंदाजी करताना त्रास होत होता, परंतु असे असतानाही त्याला संघात कायम ठेवण्यात आले आहे. कमिन्सने आश्वासन दिले की मार्श एडिलेडमध्ये गोलंदाजी करण्यासाठी तंदुरुस्त आहे. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ अद्याप जाहीर झालेला नाही. मात्र, कर्णधार रोहित शर्मा आणि दुखापतग्रस्त सलामीवीर शुभमन गिल यांचे पुनरागमन अपेक्षित आहे.
One change confirmed as Australia lock in their playing XI for the second Test against India 👀#AUSvNZ | #WTC25https://t.co/GdZEZwrhQN
— ICC (@ICC) December 5, 2024
बोलंडच्या समावेशामुळे ऑस्ट्रेलियाच्या वेगवान आक्रमणाला बळकटी मिळणार आहे. मिशेल स्टार्क आणि कमिन्ससह त्यांच्याकडे बोलंडच्या रुपाने तगडा पर्याय आहे. भारताने पर्थ कसोटीत विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे आणि ऑस्ट्रेलियाने एडिलेडवर बरोबरी साधण्याचे लक्ष्य ठेवले आहे. भारताने सलामीचा सामना २९५ धावांनी जिंकला होता.
दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन: उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिच मार्श, ॲलेक्स केरी, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलंड.