![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ डिसेंबर ।। १९७२ पासून वापरात असलेले पॅन कार्ड आता बदलाच्या मार्गावर आहे. केंद्र सरकारने पॅन कार्डच्या नव्या आवृत्तीची घोषणा केली आहे. नागरीकांना पॅन कार्ड अपडेट करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. युजर्सचा डेटा अधिक सुरक्षित करणे आणि डिजिटल प्रक्रिया सुलभ करणे, हा त्यामागचा उद्देश आहे. मात्र नव्या पॅन कार्डबाबात जनतेच्या मनात अनेक संभ्रम आहेत. नवीन पॅन कार्ड बनवण्यसाठी पैसे आकारले जाणार का? नवीन पॅन कार्ड तयार करण्यासाठी कुठे जावं लागेल की घरीच मिळेल? जर नव्या पॅन कार्डबाबात मेसेज, कॉल आलं तर काय करावं? याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात.
केंद्रिय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘पॅन कार्डची नवीन एडिशन नवीन वैशिष्ट्यांसह सुसज्ज असेल. आपला पॅन क्रमांक तसाच राहील. या कार्डवर क्युआर कोड दिला जाईल. यात तुमची सर्व माहिती असेल. याचा वापर करून कर भरणे, कंपनीची नोंदणी, किंवा बँकेत खाते उघडणे सोपे होणार आहे. शिवाय पॅन कार्डच्या अपग्रेड व्हर्जनसाठी वापरकर्त्याला कोणतीही रक्कम भरावी लागणार नाही.’ असंही केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केलं.
देशातील ७८ कोटी लोकांना पॅन कार्ड देण्यात येईल. त्यांना विभागाकडून पॅन कार्ड पाठवण्यात येईल. काहींच्या मनात पॅन कार्ड नंबर बदलण्यात येणार का? अशी शंका उपस्थित केली. पण अपग्रेड पॅन कार्ड प्रक्रियेत नंबर बदलले जाणार नाहीत. असं सरकारने स्पष्ट केलं. प्रत्येकाचा पॅन नंबर एकच राहील, आणि जोपर्यंत कार्ड तुमच्या हातात येत नाही. तोपर्यंत सर्व कामे जुन्या पॅन कार्डच्या माध्यमातून करत राहा.
नवीन कार्ड अर्ज करण्यासाठी तुम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही. सरकार नवीन अपडेटेड पॅन कार्ड थेट तुमच्या पत्त्यावर पाठवेल. महत्त्वाचे म्हणजे जर पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी जर कोणी फोन, मेसेज, किंवा ई-मेल पाठवले असेल, तर त्याला उत्तर देऊ नका. कोणतीही माहिती किंवा ओटीपी शेअर करू नका. सायबर फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करा.