Weather Update : राज्यात उन्हाचा चटका कायम : तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ डिसेंबर ।। Weather Updates News in Marathi : हिवाळ्यामध्ये अचानक ऊन्हाळ्याची जाणीव नागरिकांना होत आहे. मागील काही दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आहे. राज्यात तापमानाचा पारा ३६ अंशाच्या पुढे गेला आहे. त्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस हजेरी लावत आहे. आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे, विजांसह जोरदार सरींची शक्यता आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. धुळे, जळगाव, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे.

सोमवारपासून महाराष्ट्रातील ढगाळ वातावरण निवळून, हळूहळू पुन्हा थंडीला सुरूवात होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सोमवार ते शुक्रवारपर्यंतच्या पाच दिवसात मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात पहाटे ५ चे किमान तापमानाचा पारा पुन्हा १० ते १२ डिग्रीपर्यंत घसरू शकतो. मुंबईसह कोकणातील पहाटे ५ चे किमान तापमान ही सध्यापेक्षा घसरून १८ ते २० डिग्रीपर्यंत घसरण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे त्या पाच ते दिवसात थंडी वाढण्याची शक्यता आहे.

सध्या मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रात दुपारी ३ वाजताचे कमाल तापमान सरासरीइतके म्हणजे ३० तर पहाटे ५ चे किमान तापमान सरासरीपेक्षा ५ डिग्रीने अधिक म्हणजे २० डिग्रीच्या दरम्यान जाणवत आहे. तर मुंबईसह कोकणात दुपारी ३ चे कमाल तापमान ३१ ते ३४ तर पहाटे ५ चे किमान तापमान २४ ते २६ डिग्री सेंटीग्रेडच्या दरम्यान जाणवत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात एकाकी थंडी कमी झाली आहे. सोमवापपासून हळूहळू थंडी वाढण्याची शक्यता आहे.

पुण्यात थंडीत उन्हाळा!
पुणे शहरातील तापमानामध्ये वाढ झाल्याने थंडी गायब झाल्याचे चित्र आहे. सोमवारपासून हळूहळू थंडीला सुरूवात होईल. किमान तापमान २१ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने पुणेकरांनी थंडीमध्ये उन्हाळ्याचा अनुभव घेतलाय. मात्र पुढील दोन-तीन दिवसांमध्ये किमान तापमानामध्ये चार अंश सेल्सिअस घट होऊन थंडीचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली.

पुणे शहरामध्ये शनिवारी किमान तापमान १९.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तर ३४ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून किमान तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे शहरातील थंडी गायब झाली होती.मात्र किमान तापमानामध्ये घट होऊन थंडी वाढणार असल्याने पुणेकरांना दिलासा मिळणार आहे.मंगळवारी किमान तापमान १५ अंश सेल्सिअस नोंदविले जाईल. तर आकाश मुख्यतः निरभ्र राहून सकाळी धुके पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *