महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० डिसेंबर ।। स्मार्टफोनचा वाढता वापर आणि डिजिटल जगातील प्रगतीमुळे सायबर गुन्ह्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अनेक सायबर गुन्हेगार बनावट अॅप्स तयार करतात, जे खऱ्या अॅप्ससारखे दिसतात. मात्र, हे अॅप्स तुमची महत्त्वाची माहिती चोरून सायबर फसवणुकीसाठी वापरतात. क्रेडिट कार्ड नंबर, पिन्स, सिक्युरिटी कोड यासारखी गोपनीय माहिती चोरून, ती वापरून आर्थिक फसवणूक केली जाते.
याशिवाय, तुमच्या वैयक्तिक फोटोंचा आणि व्हिडिओंचा वापर करून ब्लॅकमेलिंगसुद्धा केली जाते. या पार्श्वभूमीवर, सरकारने नागरिकांना जागरूक करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. दूरसंचार विभागाने नुकताच एक व्हिडिओ प्रसिद्ध करून स्मार्टफोनवरील धोकादायक अॅप्स ओळखण्यासाठी सोपी पद्धत सांगितली आहे.
पाहा
धोकादायक अॅप्स ओळखण्यासाठी पाच सोपे टप्पे-
1. तुमच्या स्मार्टफोनवरील Google Play Store उघडा.
2. उजव्या वरच्या कोपऱ्यातील प्रोफाइल आयकॉनवर टॅप करा.
3. मेनूमधून Play Protect हा पर्याय निवडा.
4. पुढील स्क्रीनवर Scan हा पर्याय निवडा.
5. Play Protect तुमच्या फोनवरील अॅप्स स्कॅन करून धोकादायक अॅप्सची माहिती देईल.
ही पद्धत अवलंबून तुम्ही तुमचा स्मार्टफोन सुरक्षित ठेवू शकता आणि फसवणुकीपासून बचाव करू शकता.
आपके फोन में harmful apps तो नहीं?
पता लगाने के लिए वीडियो देखें👇 pic.twitter.com/2xTkS90Lml
— DoT India (@DoT_India) December 8, 2024
स्पॅम कॉल्स व मेसेजेसवरही होणार नियंत्रण
सायबर सुरक्षेबरोबरच, स्पॅम कॉल्स आणि मेसेजेसच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार लवकरच नवीन नियम लागू करणार आहे. ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी सांगितले की, यासाठी दूरसंचार क्षेत्रातील तज्ज्ञांशी सल्लामसलत सुरू आहे.
या नव्या नियमांमुळे प्रमोशनल कॉल्स व मेसेजेसचा त्रास कमी होण्याची अपेक्षा आहे. याबाबत जून महिन्यात काही मार्गदर्शक तत्त्वेही जाहीर करण्यात आली होती. ग्राहकांचे हक्क जपण्यासाठी आणि दूरसंचार नियामकांना अधिक शक्ती देण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
स्मार्टफोनचा योग्य वापर आणि सायबर सुरक्षेच्या उपाययोजना यामुळे फसवणुकीचे प्रकार टाळता येऊ शकतात. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सूचना पाळून सुरक्षित डिजिटल जीवन जगण्याचा प्रयत्न करा.