घाऊक महागाईतही घसरण; नोव्हेंबरमध्ये तीन महिन्यांतील नीचांकावर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ डिसेंबर ।। खाद्यवस्तूंच्या किमती कमी झाल्याने सरलेल्या नोव्हेंबर महिन्यांत घाऊक महागाई दर १.८९ टक्क्यांवर ओसरल्याचे अधिकृत आकडेवारीने सोमवारी स्पष्ट केले. घाऊक महागाईची ही मागील तीन महिन्यांतील नीचांकी पातळी आहे.

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित घाऊक महागाईचा दर ऑक्टोबरमध्ये २.३६ टक्के होता. तो नोव्हेंबरमध्ये १.८९ टक्क्यांवर उतरला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात हा दर ०.३९ टक्के होता. तर चालू वर्षात ऑगस्टमध्ये हा दर १.२५ टक्के पातळीवर होता. त्यानंतरची नीचांकी पातळी घाऊक महागाई दराने नोव्हेंबरमध्ये गाठली आहे. गेल्या महिन्यात प्रामुख्याने खाद्यवस्तूंची महागाई कमी झाली आहे. खाद्यवस्तूंच्या महागाईचा दर ऑक्टोबरमध्ये १३.५४ टक्के होता. तो नोव्हेंबरमध्ये ८.६३ टक्क्यांवर घसरला आहे.

भाज्यांचा महागाई दर ऑक्टोबरमध्ये ६३.०४ टक्के होता, तो नोव्हेंबरमध्ये २८.५७ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. गेल्या महिन्यात बटाट्याच्या किमतीतील वाढ वार्षिक तुलनेत ८२.७९ टक्के झाली आहे. मात्र, कांद्याच्या महागाईत घसरण होऊन ती २.८५ टक्क्यांवर सीमित राहिली आहे. इंधन व ऊर्जा क्षेत्रातील महागाईचा दर कमी होऊन ५.८३ टक्के राहिला आहे. उत्पादित वस्तूंचा महागाईचा दर २ टक्क्यांवर पोहोचला आहे.

व्याज दरात कपातीची शक्यता
महागाईतील घसरणीमुळे फेब्रुवारीमधील पतधोरणात रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात पाव टक्का कपात होऊ शकते, असा अंदाज बार्कलेज बँकेने वर्तविला आहे. बार्कलेज बँकेने म्हटले आहे की, पुढील वर्षी मार्चअखेरपर्यंत किरकोळ महागाईचा दर ४ टक्क्यांच्या आसपास राहील. रिझर्व्ह बँकेच्या किरकोळ महागाई संबंधाने अनुमानित उद्दिष्टाएवढा हा अंदाज आहे. यामुळे फेब्रुवारीतील पतधोरणात मध्यवर्ती बँकेकडून व्याजदरात पाव टक्का कपात अपेक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *