‘आयुष्मान कार्ड’ तयार : गरीब व गंभीर आजाराच्या रुग्णांना मिळणार दिलासा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ डिसेंबर ।। आयुष्मान भारत कार्ड असेल त्यांना पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळतात. राज्यातील सहा विभागातील नऊ कोटी ६४ लाख ७८ हजार ५५० पात्र नागरिकांपैकी तीन डिसेंबरपर्यंत राज्यात दोन कोटी ९० लाख ७१ हजार ६२४ नागरिकांनी आयुष्मान भारत कार्ड काढले आहे. त्यांना मोफत उपचार मिळणार आहेत. अद्याप सहा कोटी ७४ लाख सहा हजार ९२६ नागरिकांनी कार्ड काढले नाही.

‘आयुष्मान भारत’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना या एकच आहेत. समाजातील शेवटच्या माणसांपर्यंत दर्जेदार व उत्तम आरोग्य सुविधा पोहोचविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. केंद्र शासन आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना राबवत आहे. २०१८ मध्ये ही योजना सुरू झाली. या कार्डधारकाला पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतात. या योजनेमध्ये एक हजार ३५६ प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार होतात.

राज्यात आयुष्मान भारत कार्ड काढण्यासाठी एकूण सहा विभाग आहेत. यात नाशिक, पुणे, नागपूर, कोकण, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती यांचा समावेश आहे. यात सर्वाधिक कार्ड पुणे विभागातून काढले आहेत. पुणे विभागाला एक कोटी ९६ लाख १७ हजार ७५२ नागरिकांचे उद्दिष्ट आहे. यापैकी ५८ लाख ९२ हजार ५७७ नागरिकांनी कार्ड काढले आहे. तर अमरावती विभागाला एक कोटी ३६ लाख ९५ हजार ८० नागरिकांचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ३५ लाख सात हजार ८६४ नागरिकांनी हे कार्ड काढले आहे. ही संख्या इतर विभागापैकी सर्वात कमी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *