महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२० डिसेंबर ।। पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सध्या तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने ८१ धावांनी विजय मिळवला. या विजयासह मालिकेत पाकिस्तानने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
पाकिस्तानच्या विजयात बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि कामरान गुलाम यांनी अर्धशतकं झळकावत मोलाचा वाटा उचलला. तसेच शाहिन शाह आफ्रिदीने ४ विकेट्स घेतल्या. दरम्यान, या सामन्यात एक मोठा वादही झाल्याचे पाहायला मिळाले.
पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान आणि हेन्रिक क्लासेन यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. झाले असे की दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलर आणि क्लासेन फलंदाजी करत असताना असलेल्या २६ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर गोलंदाज हॅरिस रौफ क्लासेनला काहीतरी म्हणाला. त्यावेळी पंचांनी मध्यस्थी केली.
त्यानंतर मोहम्मद रिझवान क्लासेनला काहीतरी म्हणाला, त्यावर त्या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यावेळी डेव्हिड मिलरही मध्ये पडला. वाद वाढत असल्याचे लक्षात येताच पंचांनी मध्यस्थी केली.
तसेच बाबर आझमही त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होता. त्यांचे वाद सुरू असतानात रौफही काहीतरी बोलण्यास आला होता. पण बाबर आझमने त्याला मागे ढकलत मध्ये न पडण्यास सांगितले. नंतर वाद निवळला आणि पुढे खेळ सुरू झाला.
सामन्याबद्दल सांगायचे झाले तर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ४९.५ षटकात सर्वबाद ३२९ धावा केल्या. पाकिस्तानकडून रिझवानने ८२ चेंडूत ८० धावांची खेळी केली. या खेळीत ७ चौकर आणि ३ षटकार मारले. तसेच बाबर आझमने ९५ चेंडूत ७३ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ७ चौकार मारले.
कामरान गुलामने ३२ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांसह ६३ धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून क्वेना मफाकाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. मार्को यान्सिनने ३ विकेट्स घेतल्या. बीजॉर्न फॉर्चुन आणि फेलुक्वायो यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
त्यानंतर ३३० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघ ४३.१ षटकात सर्वबाद झाला. दक्षिण आफ्रिकेकडून क्लासेनने ७४ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांसह ९७ धावांची खेळी केली. पण बाकी कोणाला खास काही करता आले नाही.
पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदीने ४ विकेट्स घेतल्या, तर नसीम शाहने ३ विकेट्स घेतल्या. अब्रार अहमदने २ आणि सलमान आघाने १ विकेट घेतली.
