महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२० डिसेंबर ।। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवारांनी ईव्हीएम तपासणीसाठी अर्ज केला होता. मात्र त्यांनी तो अर्ज आता माघारी घेतला आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी निवडणुकीच्या निकालानंतर जिल्हा निवडणूक शाखेकडे ईव्हीएम तपासणी करण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी संबंधित प्रक्रियेसाठी लागणारे शुल्क ही त्यांनी भरले होते. मात्र आता त्यांनी या प्रक्रियेतून अर्ज करून माघार घेतली आहे.
एकीकडे महाविकास आघाडी कडून ईव्हीएम मशीनबाबत शंका व्यक्त केली जात असतानाच युगेंद्र पवार यांनी मतदानयंत्र तपासणी प्रक्रियेतून माघार घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या ११ पराभूत उमेदवारांनी मतदान यंत्राच्या तपासणीसाठी जिल्हा निवडणूक शाखेकडे अर्ज केले होते. त्यात बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले युगेंद्र पवारांचाही समावेश होता. मात्र त्यांनी या प्रक्रियेतून निवडणूक शाखेकडे अर्ज करून माघार घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ८ व काँग्रेसच्या तीन उमेदवारांनी फेर तपासणीसाठी अर्ज केले होते. या प्रक्रियेसाठी प्रत्येकी ४२ हजार ५०० रुपये अधिक १८ टक्के जीएसटी आकारून एकूण ४७ हजार २०० रुपये आकारले आहेत. त्यानुसार या सर्व उमेदवारांनी ६४ लाख ६६ हजार ४०० रुपये जिल्हा निवडणूक शाखेकडे जमा केले आहेत.
युगेंद्र पवार काय म्हणाले..?
प्रत्येक उमेदवाराला फेर तपासणी करण्याचा अधिकार असतो. त्यासाठी आम्ही अर्ज केला होता. नंतर साहेबांनी सांगितले की हा विषय वाढवायला नको..! म्हणून आम्ही अर्ज माघारी घेतला. अर्ज करण्यावेळी अधिकचा विचार केला नव्हता.