महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२६ डिसेंबर ।। कॅन्सर म्हटलं की, अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. कारण कॅन्सर झाल्यावर मृत्यू होतो, असं समज अजून लोकांच्या मनात आहे. मात्र नुकतंच एक संशोधन करण्यात आलं आहे. जगभरातील मृत्यूचं प्रमुख कारण असलेल्या कॅन्सरबाबत शास्त्रज्ञांनी मोठी प्रगती केलीये. कॅन्सरबाबत हे एक मोठं संशोधन मानण्यात येतंय.
नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून असं दिसून आलंय की, कॅन्सरच्या पेशी 99% ने नष्ट करण्याचा चमत्कारिक मार्ग सापडलाय. हा अभ्यास अमेरिकेतील राइस युनिव्हर्सिटी, टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासच्या शास्त्रज्ञांच्या टीमने केला आहे.
काय आहे हे संशोधन?
जर्नल नेचर केमिस्ट्रीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं म्हटलंय की, शास्त्रज्ञांनी कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी ‘नियर-इन्फ्रारेड लाइट’ चा वापर केला. या तंत्रात ‘अमिनोसायनिन’ नावाच्या मॉलिक्यूलचा वापर करण्यात आला. हे मॉलिक्यूल कॅन्सरच्या पेशींचा पडदा तोडण्यास सक्षम आहे. हे रेणू आधीच बायोइमेजिंग आणि कॅन्सर शोधण्यासाठी वापरलं गेलं आहेत.
राइस युनिव्हर्सिटीचे केमिस्ट जेम्स टूर यांनी याला ‘मॉलेक्युलर जॅकहॅमर’ असं म्हटलं आहे. जे पूर्वीच्या कॅन्सर मारणाऱ्या रेणूंपेक्षा लाखो पटीने वेगवान आहे. त्यांनी नमूद केलं की, ही नवीन पिढीची आण्विक मशीन आहेत, जी कॅन्सरच्या पेशी प्रभावीपणे नष्ट करू शकतात. हे नियर-इन्फ्रारेड लाईटद्वारे एक्टिव्ह केले जाऊ शकतात, जे शरीराच्या आत खोलवर पोहोचू शकतात.
कसं काम करतं हे तंत्रज्ञान?
अमिनोसायनिन मॉलिक्यूल नियर-इन्फ्रारेड लाईटच्या संपर्कात आल्यावर कंपन करू लागतात. या कंपनामुळे कॅन्सरच्या पेशींचा पडदा तुटतो आणि त्यांचा पूर्णपणे नाश होतो. या तंत्राचं सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते शरीराच्या आत खोलवर हाडं आणि अवयवांमध्ये उपस्थित कॅन्सर बरा करू शकतात. मुख्य म्हणजे हे कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय होऊ शकतं.
या संशोधनाचा परिणाम कसा झाला?
संशोधकांनी प्रयोगशाळेत विकसीत केलेल्या कॅन्सरच्या पेशींवर या तंत्राचा वापर करून पाहिला. यावेळी त्यांना ९९% यश मिळाल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय त्यांनी या तंत्रज्ञानाची उंदरांवरही चाचणी केली, त्यापैकी निम्मे पूर्णपणे कॅन्सरमुक्त झाले.
राईस युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ सिसेरॉन आयला-ओरोज्को यांनी सांगितलं की, कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी आण्विक स्तरावरील यांत्रिक शक्तींचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे तंत्रज्ञान कॅन्सरत्या उपचारात क्रांती घडवू शक्यता आहे.