![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२९ डिसेंबर ।। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे गोवा हाऊसफुल्ल झाला आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे गोव्यातील हॉटेल्समधील खोल्या आरक्षित झाल्याने आणि भाडेदरात मोठी वाढ करण्यात आल्याने बहुतेक पर्यटक गोव्याच्या सीमेवरील सिंधुदुर्ग जिल्ह्यात वास्तव्य करून फिरण्यासाठी गोव्यात येत आहेत.
सध्या राज्यातील 80 टक्के खोल्या आरक्षित झाल्या आहेत. राज्यातील समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजले आहेत तर महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीतही लक्षणीय वाढ झाली आहे.
शनिवार आणि रविवार हे यंदा न्यू इयर विकेण्डला जोडून आल्याने गोव्यात पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. जवळपास चार ते ते पाच दिवस पर्यटक राज्यातील विविध भागांत फिरणार आहेत. सध्या वाहतूक कोंडीत वाढ झाली असून भविष्यात कोंडीचा प्रश्न उग्र रूप धारण करण्याची शक्यता आहे.
उत्तर गोव्यातील थिवी रेल्वे स्थानकावर तर पर्यटकांचे लोंढे उतरत आहेत. बागा, कळंगुट, मिरामार, हरमल, हणजूण, वागातोर समुद्र किनार्यावर देशी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. कळंगुट किनार्यावर बोट उलटून दुर्घटना घडली असली तरी भीती न बाळगता पर्यटक बोटीतून सैर करण्याला प्राधान्य देत आहेत. दरम्यान, गोव्यात येण्यासाठी तिकिटांचे दर गगनाला भिडणार आहेत. 30 आणि 31 डिसेंबर रोजीही हे दर चढेच रहाणार आहेत.
काही यू-ट्यूबर्स इन्फ्लूएन्सर्सनी समाज माध्यमांवर गोव्याची नकारार्थी प्रतिमा तयार केली असली तरी त्याचा फारसा परिणाम यावेळी पर्यंटकांवर दिसला नाही.यंदा सनबर्न महोत्सव पहिल्यांदाच पेडणेतील धारगळ या ठिकाणी होत असल्याने दक्षिणेकडून वाहतूक उत्तरेच्या दिशेने सरकणार आहे. वाहतूक पोलिसांनी त्यासाठी नियोजन केले आहे.
राज्यात 7,483 हॉटेल्स
राज्यात ‘अ ते ड’ श्रेणीची 7,483 हॉटेल्स आहेत. यात एकूण 69,369 खोल्या, तर 1,08,679 बेड आहेत. एकूण खोल्यांपैकी 80 टक्के खोल्या सध्या बूक झाल्या आहेत.
साडेसात वर्षांत 79,84,392 पर्यटकांची भेट
मागील साडेसात वर्षांत म्हणजे 2017 पासून ऑक्टोबर 2024 पर्यंत 79, 84,392 पर्यटकांनी राज्यातील विविध पर्यटन स्थळांना भेट दिली. यात 76,99,556 देशी, तर 2,84,836 विदेशी पर्यटकांचा समावेश होता.