महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२९ डिसेंबर ।। राज्यात थंडीचा कडाका असला तरी मोठ्या प्रमाणात प्रदूषणात वाढ झाल्याचे चित्र आहे. प्रदुषण प्रचंड वाढले असून हवेची गुणवत्तादेखील खराब नोंदवली गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई व लगतच्या शहरांत दाट धुरक्याची चादर पसरली आहे. हवेची गुणवत्ता खराब असल्याने त्याचा आरोग्यावरही परिणाम झाल्याचे समोर आले आहे. सर्दी, खोकला आणि श्वसनाचे आजार बळवण्यास सुरुवात झाली आहे. प्रदुषणाचा परिणाम ज्येष्ठ नागरिकांवरही होत असल्याचे समोर आले आहे.
प्रदूषणामुळे निमोनियाच्या तापाचे प्रमाण वाढले आहे. न्यूमोनिया आणि विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत्या प्रदूषणामुळे वाढत आहे. त्यातच लहान मुले आणि वृद्धांमध्ये या आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे, असं मत आरोग्यतज्ज्ञांनी नोंदवली आहे. हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेणे आणि दैनंदिन दिनचर्या पाळणे गरजेचे असल्याचा सल्ला, तज्ज्ञांनी दिला आहे.
वायुप्रदूषण त्यामुळे थंडीत सकाळी पसरणारे धुरके यामुळे फ्लू, न्यूमोनिया आणि श्वसनाचे आजार वाढले आहेत. काही महिन्यांच्या बालकांपासून ते वृद्धांपर्यंत न्यूमोनियाचा प्रादुर्भाव वाढत आहे. धुळीची अॅलर्जी, दमा आणि उच्च रक्तदाब, मधुमेह यासारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये न्यूमोनियाची गंभीर लक्षणे दिसून येत आहेत. या रुग्णांना बरे होण्यासाठीही जास्त वेळ लागतो. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे, असं डॉक्टरांनी म्हटलं आहे.
काय काळजी घ्याल!
मुलांना फ्लू आणि न्यूमोनियाची लस द्यावी.
बाहेर पडताना मास्क वापरा.
मुलांसाठी उबदार कपडे वापरा.
घरी शिजवलेले ताजे आणि गरम अन्न खा.
सकाळी किंवा धुक्यात बाहेर जाणे टाळा.
अॅलर्जी आणि दम्याच्या रुग्णांनी संध्याकाळी घराबाहेर पडणे टाळावे.
बाहेर पडताना कान, नाक आणि डोके झाकून ठेवा.
दम्याचा त्रास असलेल्यांनी थंड वातावरणात बाहेर जाणे टाळावे
राज्यात हिवतापाच्या रुग्णांमध्ये घट
हिवताप व डेंग्यूचे रुग्ण साधारणपणे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात सापडतात. मात्र वातावरणातील बदलामुळे यावर्षी संपूर्ण वर्षभर अधूनमधून रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे यंदा गतवर्षीच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये किंचित वाढ झाली असली तरी हिवतापाच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. मात्र हिवताप व डेंग्यूमुळे मृत्यू होण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे.