महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.३ जानेवारी।। गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी पुन्हा परतली आहे. राज्यात आता पुन्हा थंडीचा कडाका वाढू लागला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये देशाच्या बहुतांशी भागात सरासरी इतका पाऊस (८८ ते ११२ टक्के) पडण्याची शक्यता आहे.
नवीन तयार झालेल्या वेस्टर्नस डिस्टर्बन्समुळे सध्या जम्मू-काश्मीर आणि त्यालगत उत्तर पाकिस्तानमध्ये चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे राज्यातील हवामानात देखील बदल जाणवू लागले आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याने देशात थंडी कमी राहणार आहे. मात्र उत्तर महाराष्ट्र, गुजरात आणि पश्चिम मध्य प्रदेशात थंडीच्या लाटांचा कालावधी अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. जानेवारी ते मार्च महिन्यांतील पावसाचा तसेच जानेवारी महिन्यातील पाऊस आणि तापमानाचा अंदाज बुधवारी हवामान विभागाने जाहीर केला.
जानेवारी महिन्यात वायव्य भारताचा पूर्व भाग, मध्य भारताचा उत्तर भाग आणि पूर्व भारताचा काही भाग वगळता देशाच्या बहुतांशी भागात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील थंडी गायब झाली होती. राज्यात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाला पोषक परिस्थिती होती. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.