महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई : एकावेळी कोरोना ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या आशियातील सर्वात मोठय़ा आणि प्रचंड दाटीवाटीच्या धारावी झोपडपट्टीत कोरोना आता पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. गेल्या 11 दिवसांत धारावीत आतापर्यंत कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. धारावीत आढळलेल्या एकूण 2634 रुग्णांपैकी 2295 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून या ठिकाणी आता केवळ 81 अॅक्टिव्ह रुग्ण राहिले आहेत.
दादर, माहीम आणि दाटीवाटीच्या धारावीचा समावेश असलेल्या पालिकेच्या जी-उत्तर विभागातील धारावीतील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणणे पालिकेसमोर आव्हान निर्माण झाले होते. धारावीत 1 एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला व त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. दाटीवाटीची वसाहती असल्याने क्लोज कॉन्टॅक्टमुळे हा संसर्ग वेगाने पसरल्यास नियंत्रण मिळवणे कठीण जाईल, अशी भिती निर्माण झाली होती. मात्र पालिकेची प्रभावी उपचार पद्धती, उपाययोजना, डोअर टू डोअर सर्वेक्षण, जास्तीच जास्त चाचण्या करून रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईन करणे, तपासण्या, नियमित आरोग्य शिबीर, इमारत सील करून कंटेनमेंट झोनमध्ये नियमांची कठोर अंमलबजावणी अशा उपायायोजना करण्यात आल्यामुळे कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या धारावीत आता पूर्ण नियंत्रण मिळवण्यात आले आहे. धारावीत आठवडय़ाची सरासरी रुग्णवाढ आता 0.26 टक्क्यांवर आली आहे. तर एकावेळी दिवसाला 50 रुग्ण आढळणाऱया धारावीत गेल्या सात दिवसांची सरासरी पाहता फक्त सहा रुग्ण आढळत आहेत.
ऑक्सिजन बेड ठरले तारणहार
माहीम येथील निसर्ग उद्यानासमोर 200 खाटांचे कोरोना आरोग्य केंद्र उभारण्यात आले. येथील सर्क खाटांना ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली. यामुळे कोरोना रुग्णांना तेथे तत्काळ प्राणकायूची व्यवस्था करता आली. यामुळे धारावीमधील मृत्यू दरही कमी होऊ लागला आहे. धारावीत जूनमध्ये 31 जणांचा, तर जुलैमध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र ऑगस्टमध्ये आतापर्यंत धारावीत कोरोनामुळे एकही रुग्ण दगावला नाही.