गणपती आगमन व विसर्जनावेळी मिरवणूक काढू नये, मार्गदर्शक सूचना जाहीर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई :गणेशोत्सवादरम्यान श्रींच्या मूर्तीचे आगमन व विसर्जनावेळी मिरवणूक काढू नये, तसेच आरती, भजन व किर्तनाचे कार्यक्रम घरीच करावेत अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या आहेत. गणेशोत्सव 2020 साठी जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

या मार्गदर्शक सूचना पुढील प्रमाणे आहेत. जिह्यात येण्यासाठी एसटीने प्रवास करणाऱयांसाठी वेगळ्या ई-पासची गरज भासणार नाही. इतर खाजगी वाहनाने प्रवास करणाऱयांना ई-पास सक्तीचा असणार आहे. जिह्यात प्रवेश करणाऱया नागरिकांची नाक्यावरच तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने पुरेशा प्रमाणात पल्स ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर, रॅपीड टेस्ट किट तपासणी नाक्यावर उपलब्ध करुन द्यावे. आजाराची लक्षण आसणाऱया व्यक्ती, दुर्धर आजार असणाऱया व्यक्ती यांची रॅपीड टेस्ट करण्यात येईल. उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी तालुका पातळीवरील संबंधित गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी यांच्या बैठका घ्याव्यात. सदर बैठकीस गाव, वॉर्ड नियंत्रण समितीच्या दोन प्रतिनिधींना निमंत्रित करावे.

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी संबंधित तहसिलदार व पोलीस निरीक्षक यांच्याकडून परवनागी घेणे आवश्यक आहे. यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षीत असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करताना त्यात भपकेबाज पणा नसावा, अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या आहेत.

घराच्या जवळ विसर्जन करा!
गणेशोत्सव कालावधीत भजन, आरती, फुगडी, किर्तन, गौरी ओवसा इ. कार्यक्रम घरगुती स्वरुपात कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत साजरे करावेत. विसर्जनावेळी पारंपारिक पद्धतीने विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. संपूर्ण चाळीतील, वाडीतील, गावातील, इमारतीतील सर्व घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रित पणे काढण्यात येऊ नये, शक्यतो घरा जवळच्याच विसर्जन स्थळी मूर्तीचे विसर्जन करावे.

सार्वजनिक मंडळांनाही नियमांची चौकट
सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेश दर्शनासाठी गर्दी होणार नाही. तसेच प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणारे भावीक, शारिरीक अंतराचे, स्वच्छतेचे नियम त्यात मास्क, सॅनिटायझर वापरणे पाळतात का याची खात्री मंडळाचे अध्यक्ष यांनी करावी. मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाचे तसेच थर्मल स्क्रिनींगची व्यवस्था करण्यात यावी. श्री गणेशाचे दर्शन सुविधा ऑनलाईन, केबल, वेबसाईट, फेसबूक इत्यादी द्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. उत्सव कालावधीत गणेश मंडळा बाहेर हार, नारळ, मिठाई दुकाने लावण्यात येऊ नयेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *