महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ जानेवारी ।। दक्षिण आफ्रिकेतील सोन्याच्या खाणीत ६००हून अधिक कामगार अडकल्याची खळबळजनक घटना नोव्हेंबर २०२४ मध्ये उघडकीस आली होती. त्यापैकी १०० हून अधिक जणांचा उपासमारीने मृत्यू झाल्याचे मानले जात आहे. अद्यापही ५०० हून अधिक कामगार खाणीत अडकले आहेत. त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे, असे वृत्त ‘एपी’ने दिले आहे. जाणून घेवूया दक्षिण आफ्रिकेतील साेन्याच्या खाणीत काय घडलं? याविषयी…
साेन्याच्या खाणीत बेकायदेशीर उत्खनन
दक्षिण आफ्रिकेतील काही भाग हा सोन्याने समृद्ध असा आहे. येथे सोन्याच्या खाणी आहेत. काही काळ उत्खनन करुन कंपन्या सोने काढतात. नफा मिळणे बंद झाले की, खाणीतील उत्खनन बंद करतात. यानंतर बेकायदेशीर खाण कामगार या जागेचा ताबा घेतात. असेच दक्षिण आफ्रिकेतील नैऋत्येस सुमारे १५० किलोमीटर अंतरावर स्टिलफोंटेन शहरानजीक बफेल्सफॉन्टेन गोल्ड नावाच्या खाणीत झाले आहे. ही खाण मागील बर्याच वर्षांपासून बंद होती. मात्र सोनाच्या मोहातून येथे बेकायदेशीररित्या उत्खनन सुरु झाले. ही घटना नाेव्हेंबरमध्ये उघडकीस आली हाेती. अडकलेल्या खाण कामगारांचे नातेवाईक सांगतात की, कामगार हे जुलै २०२४पासून खाणीत काम करत हाेते.
अटक होण्याच्या भीतीने कामगार खाणीतच !
अधिकाऱ्यांनी नोव्हेंबरमध्ये बेकायदेशीरपणे खाणकाम करणाऱ्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी कारवाई सुरू केली. गेल्या दोन महिन्यांत काही खाण कामगारांना बाहेर काढले. यानंतर बेकायदेशीर उत्खनन प्रकरणी त्यांना अटकही करण्यात आली. आता अटक होण्याच्या भीतीने कामगार खाणीतून बाहेर येण्यास नकार देत आहेत, असे स्थानिक पोलिस सांगतात. खाण कामगार संघटनेने म्हटलं आहे की, देशातील सर्वात खोल खाणींपैकी एक असलेल्या बफेल्सफॉन्टेन गोल्ड खाणीत जमीनीखाली २.५ किलोमीटर अंतरावर ५०० हून अधिक कामगार अडकले आहेत. बचावकार्य काही महिन्यांपूर्वीच सुरू व्हायला हवे होते, अशी अपेक्षाही खाण कामगार संघटनांनी व्यक्त केली आहे.
कामगारांच्या सुटकेसाठी मानवाधिकार संघटनांची न्यायालयात धाव
खाण कामगार किती काळापासून खाणीत अडकले आहेत, हे स्पष्ट झालेले नाही; परंतु नोव्हेंबर २०२४पासून कामगार खाणीत अडकल्याचे मानले जात आहे. पोलिसांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता;पण तब्बल अडीच किलोमीटर खोल असणार्या ही खाण अत्यंत धोकादायक असल्याने कोणताही बचाव कर्मचारी त्यात जाणार नाही. असे अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे. दक्षिण आफ्रिका सरकारचा अंदाज आहे की, देशात सुमारे 6,000 उत्खनन करुन सोडून दिलेल्या सोन्याच्या खाणी आहेत. अशा बेकायदेशीर खाणकामामुळे दरवर्षी सुमारे 1 अब्ज डॉलर्सचा महसूल बुडतो. त्यामुळे एका केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले आहे की, नोव्हेंबर महिन्यातच प्रशासनाने अडकलेल्या सर्व कामगारांना बाहेर काढण्यासासाठी प्रयत्न केले होते. मात्र आता सरकार मदत पाठवणार नाही कारण ते बेकायदेशी सोने मिळवणारे गुन्हेगार आहेत. त्यांच्या या विधानावर देशातील मानवाधिकार संघटनांकडून तीव्र टीका केली. मानवधिकार संघटनांनी या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली. आता न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक पोलिस आणि प्रशसानानाला खाणीत अडकलेल्या कामगारांना अन्न, पाणी आणि औषधे पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रशासनाने पुन्हा एकदा सुरु केले बचावकार्य
बफेल्सफॉन्टेन गोल्ड खाणीतून अडकलेल्या कामगारांच्या बचावासाठी शुक्रवार, १० जानेवारीपासून पुन्हा एकदा मोहिम राबवण्यास सुरुवात झाली आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे ६० कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर ९० हून अधिक कामगारांना खाणीतून सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. एकाच वेळी १० पेक्षा जास्त लोकांना बाहेर काढणे शक्य नाही. त्यामुळे बचावकार्य व मृतदेह बाहेर काढणास काही आठवड्यांचा कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
