Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग पावसाळ्यापूर्वी होणार सज्ज ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ जानेवारी ।। मुंबई-गोवा महामार्गाचा कासू ते इंदापूर हा टप्पा वगळता उर्वरित महामार्ग पावसाळ्यापूर्वी सज्ज होणार आहे. हा महामार्ग एकूण १२ टप्प्यांत विकसित होत असून, त्यांची कामे सरासरी ९२ टक्के पूर्ण झाली आहेत. ही कामे पावसाळ्याआधी पूर्ण करण्याचे अलीकडे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत निश्चित करण्यात आले.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून (मॉर्थ) हा महामार्ग उभारण्यात येत आहे. एकूण ४३९.८८ किमीपैकी ८४.६० किमीचा (पनवेल ते इंदापूर) मार्ग ‘एनएचएआय’कडून दोन टप्प्यांत (पॅकेज) उभारण्यात येत आहे. उर्वरित ३५५.६० किमीचा मार्ग थेट मंत्रालयाकडून दहा टप्प्यांत बांधला जात आहे. बारा टप्प्यांपैकी चार टप्प्यांची कामे १०० टक्के पूर्ण झाली आहेत. हे चार टप्पे वगळल्यास उर्वरित आठ टप्प्यांची कामे सरासरी ८३ टक्के पूर्ण झाल्याची माहिती ‘एनएचएआय’ व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिली.

या संपूर्ण महामार्गातील आव्हानात्मक असा भाग हा रत्नागिरी जिल्ह्यातील परशुराम घाटाचा आहे. तो सद्य:स्थितीत ९४ टक्के पूर्ण झाला आहे. तर त्याआधी कशेडीजवळील भागही सरासरी ९७ टक्के पूर्ण झाला आहे. हे दोन्ही भाग रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून उभारले जात आहेत. ‘एनएचएआय’चा विचार केल्यास पनवेल ते कासू भागातील कामे विलंबाने का होईना, मात्र पूर्ण झाली आहेत. कासू ते इंदापूरदरम्यानच्या कामांना थोडा विलंब होत असल्याचे समोर आले आहे.

महामार्गावर वाहनांची सुरळीत ये-जा शक्य होण्यासाठी आवश्यक असलेली इंदापूर ते वाकेडपर्यंतची बांधकामे पावसाळ्याआधी पूर्ण होतील. त्यापुढे झारप म्हणजे सिंधुदुर्ग-गोवा सीमेपर्यंत महामार्ग रस्ता १०० टक्के पूर्ण असून, वाहतूक सुरू आहे. – प्रशांत फेगडे, मुख्य अभियंता, मॉर्थ, मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *