महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शनीवार दि. १५ फेब्रुवारी ।। महापालिकेने पाणीपट्टीची 726 कोटी 12 लाखांची थकबाकी फेब्रुवारीअखेरपर्यंत तत्काळ जमा करावी; अन्यथा 25 फेब्रुवारीपासून महापालिकेला केला जाणारा पाणीपुरवठा टप्या टप्याने कमी करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा पाटबंधारे विभागाने महापालिकेला दिला आहे. त्यामुळे शहरावर पाणीकपातीचे संकट उभे ठाकले आहे.
खडकवासला धरणसाखळीतून शहराला पाणीपुरवठा होतो. पाटबंधारेकडून शहरासाठी साडेअकरा टीएमसी पाणीसाठा मंजूर करण्यात आला आहे. मात्र, शहराची लोकसंख्या वाढल्याने महापालिका मंजूर कोट्यापेक्षा अधिक पाणी घेते. गेल्या दोन वर्षांत हा आकडा 20 टीएमसीपर्यंत पोहचला आहे.
मंजूर कोट्यापेक्षा अधिकच्या पाण्यावर महापालिकेकडून अतिरिक्त दराने पाणीपट्टी वसूल केली जाते. त्यामुळे पाटबंधारेच्या पाणीपट्टी थकबाकीचा आकडा 716 कोटी 12 लाखांवर पोहचला आहे. महापालिकेकडून ही थकबाकी भरली जात नसल्याने पाटबंधारेने आता थेट शहराचा पाणीपुरवठा कमी करण्याचा इशारा दिला आहे.
खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्वे. या. कुर्हाडे यांनी याबाबत महापालिकेला पत्र पाठविले आहे. त्यात फेब्रुवारीअखेरपर्यंत पाणीपट्टीची थकबाकी न भरल्यास दि. 25 फेब्रुवारीपासून टप्या टप्याने पाणी कमी करण्याचा इशारा दिला आहे.
पाटंबधारे विभागाने पाठविलेल्या पत्राबाबत महापालिका आयुक्तांशी चर्चा करून पुढील कार्यवाही केली जाईल.
– प्रसन्नराघव जोशी, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा