पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या फायद्याची सर्वात मोठी सुविधा बंद होणार, संस्थेचा मोठा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शनीवार दि. १५ फेब्रुवारी ।। पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेली प्रीपेड रिक्षा सेवा स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या रिक्षाचालकांमुळे पुन्हा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. प्रीपेड बूथजवळ येऊन प्रवाशांना आणि त्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाचालकांना दमदाटी केली जाते; तसेच दहशत माजवून प्रवाशांना घाबरवले जात आहे. त्यामुळे हा बूथ बंद करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. या सर्व गोष्टींकडे स्थानिक पोलिस, वाहतूक पोलिस आणि रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.

पुणे रेल्वे स्थानकावरून दररोज दीड ते दोन लाख प्रवाशांची ये-जा सुरू असते. त्यामुळे स्थानकावर नेहमीच गर्दी असते. या ठिकाणी वर्षानुवर्षे रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करणाऱ्या काही जणांकडून प्रवाशांची अडवणूक करून अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जाते. ५० ते ६० रुपयांत होणाऱ्या प्रवासासाठी १०० ते २०० रुपये खुलेआमपणे आकारले जातात. त्यामुळेच काही महिन्यांपूर्वी वाहतूक पोलिस, रेल्वे प्रशासन, ‘आरटीओ’ यांच्या मदतीने एका संघटनेने पुणे रेल्वे स्थानकावर प्रीपेड रिक्षा बूथ सुरू केला. त्याचा रात्रीच्या वेळी येणाऱ्या प्रवाशांना खूपच चांगला फायदा होत होता; पण या बुथमुळे प्रवाशांची लूटमार करणाऱ्या रिक्षाचालकांना प्रवासी मिळेना झाले. तरीही ते दमदाटीने प्रवाशांना रिक्षामध्ये बसवण्याचा प्रयत्न करतात; तसेच प्रीपेड रिक्षा बूथवर जाऊन गोंधळ घालणे, तिथे नोंदणी असलेल्या रिक्षाचालकांना दमदाटी करणे, प्रवाशांना दम देणे असे प्रकार घडू लागले आहे.

याबाबत स्थानिक पोलिसांकडे तक्रार केली तरी त्यांच्याकडून काहीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे या स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या रिक्षाचालकांचे चांगले फावले आहे. ते आता थेट प्रवाशांना शिवीगाळ व दमदाटी करू लागले आहेत. त्यामुळे प्रीपेड रिक्षा बूथ संस्थेने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसणार आहे.

प्रीपेड रिक्षा बूथला चोवीस तास संरक्षण देण्याचे आश्वासन पोलिस प्रशासनाने दिले होते. त्या ठिकाणी किमान एक पोलिस चोवीस तास उपस्थित राहणार होता; पण तसे कोणतेही संरक्षण पोलिसांनी दिले नाही; तसेच यापूर्वीही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी प्रवासी व रिक्षाचालकांना दमदाटी करून प्रीपेड रिक्षा बूथ बंद पाडले होते. त्यामुळे आता तरी पोलिसांनी या प्रीपेड रिक्षा बूथला संरक्षण देण्याची आवश्यकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *