महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। मंगळवार दि. १८ फेब्रुवारी ।। गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील तापमानात चढउतार पाहायला मिळत आहेत. परंतु, गेल्या तीन दिवसांमध्ये मुंबईतील तापमान प्रचंड वाढले होते. त्यामुळे मुंबईकरांना थंडीच्या महिन्यांत उकाडा जाणवू लागला होता. गेल्या तीन दिवसांमध्ये मुंबईतील (Mumbai) कमाल तापमान 36 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवण्यात आले. सोलापूरमध्ये सर्वाधिक म्हणजे 37.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. सोमवारी रविवारच्या तुलनेत कमाल तापमानाचा (Temperature) पारा तब्बल 5 अंशांनी घसरला होता. आता पुढील दोन ते तीन दिवसांत मुंबईतील कमाल आणि किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. हवेच्या दाबात बदल होत असल्याने थंडीच्या प्रमाणातही दररोज चढउतार होईल, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. तापमानातील या सततच्या चढउतारांमुळे मुंबईकरांना सध्या सर्दी, खोकला आणि साथीचा ताप अशा आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
सोमवारी मुंबईतील कुलाबा केंद्रावर कमाल तापमान 30.5 अंश सेल्सिअस तर सांताक्रुझ केंद्रावर कमाल तापमान 33.4 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले होते. आता पुढील दोन- तीन दिवस कमाल तापमानाचा पारा 33 ते 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे. मुंबईसह अलिबाग, कोल्हापूर आणि मालेगावमध्येही कमाल तापमानात घट नोंदवण्यात आली आहे. तर राज्यातील बहुतांश भागात किमान तापमानाचा आकडा 11 ते 18 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना पहाटे गारवा आणि दुपारी उन्हाचे चटके अशा परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. पुढील काही दिवस ही परिस्थिती कायम राहणार असल्याचे दिसत आहे.
यंदाच्या उन्हाळा भीषण?
हवामान खात्याकडून यंदाचा उन्हाळा तीव्र असू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यंदाचा जानेवारी महिना हा आतापर्यंतच्या जानेवारी महिन्यापेक्षा उष्ण ठरला आहे. यंदा उन्हाळ्याचा हंगाम लवकर सुरु होऊ शकतो. तर एप्रिल आणि मे महिन्यांत उन्हाचा कडाका वाढेल. उन्हाळ्यात नेहमी असणाऱ्या तापमानाच्या तुलनेत यंदा कमाल आणि किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसची वाढ होऊ शकते. तसे घडल्यास मुंबईकरांना प्रचंड उकाडा सहन करावा लागू शकतो.
सोमवारी 36 अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे
सोमवारी राज्यातील अनेक भागांमध्ये 36 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली.
सोलापूर- 37.4
ब्रह्मपुरी- 37.2
अकोला- 36.7
जेऊर-36.5
परभणी- 36.5
नागपूर-36.5
चंद्रपूर- 36.4
सांगली- 36.3
वर्धा- 36