महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शुक्रवार दि. ७ मार्च ।। पुण्यामध्ये अनेक ठिकाणचे पाणी पिण्यासाठी चांगले नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. एकीकडे पुण्यामध्ये जीबीएसने थैमान घातलं आहे तर दुसरीकडे पुण्यामध्ये दुषित पाणी पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुणेकर जे पाणी पितात ते खरंच पिण्यासाठी योग्य आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरात १३८ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात आहे. पालिकेकडून पुरवठा विभागाला शुद्ध पाणी पुरविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुषित पाणी पुरवठा होत असल्याची माहिती समोर येताच पुणेकर चिंतेत आले आहेत.
सिंहगड रस्ता परिसरात गुइलेन बॅरे सिंड्रोमचा उद्रेक झाल्यानंतर महापालिकेने पाणी तपासणी मोहीम हाती घेतली. या परिसरातील पाण्याचे नमुने सातत्याने तपासण्यात येत आहेत. आतापर्यंत ७ हजार १९५ नमुने तपासण्यात आले असून त्यातील १३८ पाणी नमुने पिण्यास अयोग्य आढळले आहेत. या प्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने पाणीपुरवठा विभागाला दूषित नमुने आढळलेल्या भागात शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची सूचना करण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यात जीबीएसची रुग्णसंख्या २२४ वर गेली आहे. यामधील १९५ रुग्णांचे जीबीएस निदान झाले आहे. जीबीएसचे आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळले असून त्यात पुणे महापालिका ४६, महापालिकेत नव्याने समाविष्ट गावे ९५, पिंपरी-चिंचवड महापालिका ३३, पुणे ग्रामीण ३६ अशी रुग्णसंख्या आहे. राज्यात इतर जिल्ह्यांत आतापर्यंत १४ रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यात आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी २६ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. राज्यभरात १७८ रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. जीबीएसमुळे आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.