Weather Update: राज्यात सूर्य तळपतोय ; तापमानात वाढ, कोकणासाठी IMD चा अलर्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शनिवार दि. ८ मार्च ।। सूर्य तळपायला लागल्याने राज्यातील तापमानात वाढ होत आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर आणि रत्नागिरी येथे ३८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली, जी राज्यातील सर्वाधिक होती. त्याचवेळी, नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे ८ अंश सेल्सिअस नीचांकी तापमानाची नोंद झाली.

आज राज्यात उन्हाचा तडाखा वाढण्याची शक्यता असून, कोकणातील उष्ण व दमट हवामानामुळे हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या २४ तासांमध्ये (शुक्रवारी सकाळपर्यंत) रत्नागिरी आणि सोलापूर पाठोपाठ जेऊर, सांगली, सातारा आणि वाशीम येथे कमाल तापमान ३७ अंशांच्या पुढे गेले आहे. तसेच पुणे, कोल्हापूर, धाराशिव, परभणी आणि अकोला येथे तापमान ३६ अंशांच्या पार पोहोचले आहे.

सध्या कमाल तापमान वाढत असल्यामुळे दुपारच्या वेळी उन्हाच्या झळा अधिक जाणवत आहेत आणि उकाडाही वाढलेला आहे. मात्र, उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे किमान तापमानात काहीशी घट झाली होती. आता किमान तापमान पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. काल निफाड येथील गहू संशोधन केंद्रात किमान तापमान ८ अंश, परभणी येथील कृषी विद्यापीठात ९.५ अंश, तर जळगाव येथे ९.८ अंश नोंदवले गेले.

धुळे येथील कृषी महाविद्यालय आणि अहिल्यानगर येथे तापमान ११ अंशांच्या खाली नोंदवले गेले. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात २० ते २८ अंशांपर्यंत मोठी तफावत पाहायला मिळाली.

आज कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत हवामान सरासरीपेक्षा उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच, उर्वरित महाराष्ट्रात कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *