महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। बुधवार दि. २६ मार्च ।। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ‘पैसे द्या, अमेरिकत कायम रहा’ ही ‘गोल्ड कार्ड’ व्हिसा योजना हिट झाली आहे. 50 लाख डॉलर्समध्ये (साधारण 43 कोटी रुपये) अमेरिकेत कायमस्वरूपी वास्तव आणि पर्यायी नागरिकत्व देणाऱ्या या योजनेचा एका दिवसात एक हजार लोकांनी फायदा घेतला. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी लोक रांगेत उभे आहेत, असा दावा अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी केला.

एका पॉडकास्टदरम्यान हॉवर्ड लुटनिक यांनी सांगितले की, गोल्ड कार्ड योजना दोन आठवडय़ांनी औपचारिकपणे सुरू होईल. त्यासाठी इलॉन मस्क सध्या सॉफ्टवेअर विकसित करत आहेत, परंतु योजना सुरू होण्यापूर्वीच एकाच दिवसात एक हजार गोल्ड कार्ड विकले गेले आहेत. जगभरातील 3.7 कोटी लोक गोल्ड कार्ड घेण्यासाठी सक्षम असल्याचे लुटनिक यांनी सांगितले. जर तुमच्याकडे ग्रीन कार्ड असेल किंवा आता गोल्ड कार्ड असेल तर तुम्ही अमेरिकेचे कायमचे रहिवासी होऊ शकता आणि तुम्हाला करदेखील भरावा लागणार नाही. गोल्ड कार्ड घेणाऱ्यांना 50 लाख डॉलर्स देऊन अमेरिकेत अनिश्चित काळासाठी राहण्याचा अधिकार मिळेल.