महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ एप्रिल ।। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापर कर धोरणाचे गंभीर परिणाम एकीकडे अमेरिकन शेअर बाजारात दिसून येत असताना दुसरीकडे आशियाई शेअर बाजारांमध्येही मोठी पडझड पाहायला मिळाली. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई शेअर बाजार तब्बल २६०० अंकांनी कोसळल्याचं पाहायला मिळालं. सेन्सेक्सप्रमाणेच निफ्टीचीही मोओठी पडझड झाली असून तो थेट २१,८०० अंकांच्या खाली गेला आहे. जगभरातल्या शेअर बाजारांवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार कराचे परिणाम दिसू लागले आहेत.
मुंबई शेअर बाजारात व्यवहार सुरू होताच मोठी पडझड झाल्याचं पाहायला मिळालं. हिंदुस्तान युनिलिव्हर, पॉवर ग्रीड, भारती एअरटेल, आयटीसी, एशियन पेंट्स, नेसले इंडिया, बजाज फिनसर्व्, टायटन, कोटक महिंद्रा, अल्ट्रा सिमको, मारूती यांच्या शेअर्समध्ये पहिल्या सत्राच्या सुरुवातीलाच मोठी घसरण दिसून आली. परिणामी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स थेट २५०० हून अधिक अंकांनी घसरला. सेन्सेक्स कोसळून थेट ७२ हजार ७०० अंकांपर्यंत खाली आल्याचं पाहायला मिळालं.
Nifty50 चीही हाराकिरी
एकीकडे सेन्सेक्समध्ये कोलाहल सुरू असताना निफ्टीनंही सेन्सेक्सच्याच पावलावर पाऊल ठेवलं आणि गुंतवणूकदारांना धडकी भरली. सकाळी शेअर बाजारात उघडताच निफ्टी५० ८३१.९५ अंकांनी कोसळला. सकाळी ९.३० च्या सुमारास निफ्टी २२ हजार ०७२ अंकांपर्यंत खाली आल्याचं दिसून आलं.
सर्वच क्षेत्रांमध्ये गुंतवणूकदार हवालदील
सोमवारच्या व्यवहारांमध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये गुंतवणूकदारांमध्ये ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाची दहशत दिसून आली. बँकिंग, तंत्रत्रान आणि ऑटोमोबाईल या नेहमी गुंतवणूकदारांना हात देणाऱ्या क्षेत्रांमध्येही मोठ्या प्रमाणावर शेअर्सची विक्री झाल्यामुळे शेअर बाजारात कमालीची अस्थिर परिस्थिती निर्माण झाली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिलपासून जगभरातल्या देशांवर व्यापार कर आकारण्याच्या धोरणाची अंमलबजावणी सुरू केली. त्याचे परिणाम आता दिसू लागले असून खुद्द अमेरिकन शेअर बाजारातही मोठी पडझड झाली. या पार्श्वभूमीवर अमेरिकन जनता देखील ट्रम्प यांच्याविरोधात रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं.
जागतिक बाजारपेठेतही शेअर बाजाराच्या गटांगळ्या
दरम्यान, मुंबई शेअर बाजाराप्रमाणेच जागतिक बाजारपेठेतही मोठी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळालं. वॉल स्ट्रीट आणि इतर आशियायी बाजारपेठांप्रमाणेच जपानमधील एमएससीआय ६.८ टक्क्यांनी घसरला तर निक्केई ६.५ टक्क्यांनी घसरल्याचं दिसून आलं.