राज्यात आगडोंब; उष्णतेच्या लाटेमुळं विदर्भासह कोकणातही होरपळ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ एप्रिल ।। केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार कर्नाटकच्या अंतर्गत भागात असणाऱ्या परिसरावरून चक्राकार वारे वाहत असून, मराठवाडा आणि तामिळनाडूच्या दक्षिणेपर्यंय अद्यापही कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. त्यातच बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे या कमी दाबाच्या पट्ट्याला मिळत असल्यामुळं दक्षिण भारतासह महाराष्ट्राच्या काही भागांवर ढगाळ वातावरणाचं सावट पाहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या अवकाळी पावसानं काहीशी उसंत घेतलेली असतानाच राज्याच्या विदर्भ आणि कोकण भागामध्ये पुन्हा तापमानवाढीस सुरुवात झाली आहे. याच धर्तीवर कोकण क्षेत्राला दमट हवामानाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दक्षिणेकडे हवामानाची प्रणाली बदलण्यास सुरुवात झालेली असतानाच उत्तरेकडूनही उष्ण वारे राज्याच्या दिशेनं येण्यास सुरुवात झाल्यामुळे इथं किमान तापमानात वाढ होताना दिसत आहे. परिणामी राज्याच्या जळगाव, नाशिक, सोलापूरसह विदर्भात अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ आणि वर्धासह मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि परभणीत पारा चाळीशीपार पोहोचला आहे. पुढच्या 24 तासांसह त्यापलिकडे पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील कमाल तापमानामध्ये दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. ज्यामुळं हवामानाच्या या अंदाजामुळं नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

10 एप्रिलनंतर राज्यावर पुन्हा अवकाळीचं सावट
10 एप्रिलनंतर देशातील वातावरण पुन्हा बदलून अवकाळीचे ढग दाटण्याची शक्यता आहे. यादरम्यान विजांचा कडकडाट, सोसायट्याचा वारा आणि वादळी हवामान राज्यात आणि देशातील इतरही भागांमध्ये पाहायला मिळू शकतं. त्यामुळं यंदाच्या आठवड्याची सुरुवात उकाड्यानं झाली असली तरीही शेवट मात्र अवकाळीनं होणार असल्याचा प्राथमिक अंदाज सध्या वर्तवण्यात येत आहे.

मुंबईतील तापमानात चढ- उताराची शक्यता…
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये तापमानाच चढउतार नोंदवला जाईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्यानुसार शहरातील तापमान 32 ते 34 अंशांदरम्यान राहील. दरम्यान शहरात दृश्यमानता धुरक्यामुळं कमी असेल असाही इशारा हवामान विभागानं जारी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *