वीजबिल शून्य झाले! राज्यातील पहिले ‘आदिवासी सौर ग्राम’ ठरले, गावातच २४०० युनिट सौर ऊर्जेची निर्मिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ एप्रिल ।। आदिवासी गाव म्हटलं की डोळ्यांसमोर उभे राहतात ते गडचिरोली जिल्ह्यातील मागासलेली गावे. मात्र विकसित चंद्रपूर जिल्ह्यात अशी अनेक गावे उभी आहेत. या गावांचा विकास संथ गतीने सुरु आहे. अश्यात एका गावाने कमाल केली आहे. या गावातच २४०० युनिट सौर ऊर्जेची निर्मिती सुरू झाली आहे. राज्यातील पहिले आदिवासी सौर ग्राम होण्याचा सन्मान या गावाला मिळाला आहे. या गावाचे नाव आहे, सादागड-हेटी.

चंद्रपूर जिल्हातील सावली तालुक्यात हे गाव येतं. विशेष म्हणजे वीस दिवसात सर्व बाधा दूर करून Mahavitaran कंपनी -जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद प्रशासनाने आदिवासी गावात वीजबिल शुन्य केले आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातले सादागड-हेटी हे गाव जिल्ह्यातील पहिले “सौरग्राम” ठरले आहे. गावात वीज जोडणीसाठी एक शाळा आणि एकुण १९ घरांचा समावेश आहे. प्रधानमंत्री सुर्यघर मोफत योजनेतील प्रतिकिलोवॅट ३० हजार रूपये अनुदानाचा लाभ घेत गावातील १९ घरांच्या छतावर प्रति एक किलोवॅटचे सौर प्रकल्प बसविण्यात आले.

त्याचबरोबर शाळेसाठी एक किलोवॅटचे स्वतंत्र सौर प्रकल्प बसवण्यात आले आहे. एकुण २० किलोवॅटची Solar System बसवण्यात आल्यामुळे महिन्याला सरासरी २४०० युनिटची वीज निर्मिती होणार आहे. १०० टक्के सौर ग्राम करण्यासाठी महावितरण, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद चंद्रपूर यांचेमार्फत तातडीने कारवाई करत २० दिवसांत सर्व अडचणी दूर करण्यात आल्या. गावातील नागरिकांच्या आर्थिक अडचणी निवारणासाठी बँकानी माघार घेतली. मात्र याच तालुक्यातील दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप, क्रेडिट सोसायटी लिमिटेड या छोट्या संस्थेने धाडसी कर्जरुपी पाठींबा दिला.

प्रबळ इच्छाशक्ती आणि समाजासाठी काहितरी चांगलं करण्याच्या हेतूने एखादे कार्य करण्याचे ठरवले की मग कितीही अडचणी येवोत त्यातून मार्ग निश्चितच निघतो. आणि त्यासाठी घेतलेल्या कष्टांमधून चांगल्या गोष्टींचीच निर्मिती होते हे या गावाच्या उदाहरणावरुन दिसून येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *