Unseasonal Rain : राज्यात या ८ जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून अलर्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ एप्रिल ।। महाराष्ट्रात सूर्य आग ओकत असतानाच हवामान विभागाने वादळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळीचे सावट आहे. मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गुरूवारी राज्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला तर काही ठिकाणी गारपिटीने तडाखा दिला. विदर्भात पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

रखरखत्या उन्हात राज्यामध्ये पावसासाठी पोषक हवामान तयार झालेय. पश्‍चिम-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडू शकतो. शिवाय काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रासाठी हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

कुठे कुठे अवकाळीचा इशारा –
पूर्व विदर्भात पुढील तीन दिवस अवकाली पावसाचा इशारा देणयात आला आहे. अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या सर्व जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह उष्ण व दमट हवामानाची शक्यता आहे.

मराठवाड्यात काय स्थिती ?
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी रात्रीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

महाबळेश्वर धुक्यात हरवले –
राज्यभरात उष्णतेची लाट उसळली असताना महाबळेश्वर चक्क धुक्यात हरवल्याचे चित्र दिसू लागले आहे. एवढच नाही तर तापमानातही झपाट्याने घसरन झाल्याने सर्वांना हायसे वाटू लागले आहे. गेल्या तीन दिवसापासून सातारा जिल्ह्यातील तापमाने उच्चांग गाठला होता. गेल्या तीन दिवसापासून अक्षरशः 40 ते 43 °c इतक्या तापमानाची नोंद झाली. यात महाबळेश्वरातीलही तापमान 36 °c वर पोहचले होते. सायंकाळनंतर अचानकच हवामानात बदल होत गेला आणि चक्क संपूर्ण महाबळेश्वर परिसर धुक्यात हरवून गेल्याचे पाहायला मिळालं.या अशा वातावरणात धुक्याची चादर पसरल्यामुळे पर्यटकांमध्ये मात्र आनंदाचा वातावरण असल्याचे पाहायला मिळाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *