महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ मे ।। मुंबई, छत्रपती संभाजीनगर – राज्यातील हवामानात गेल्या तीन-चार दिवसांपासून बदल होत असून अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे, उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळत आहे.
मात्र, आंबा व इतर पिकांच्या नुकसानीमुळे उत्पादक धास्तावले आहेत. मुंबईसह ठाणे व परिसरात काल व आज जोरदार वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली. मराठवाड्यासह नाशिकमध्येही पावसाच्या सरी बरसल्या.
मुंबईत बुधवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्याचा परिणाम मध्य आणि पश्चिम रेल्वे वाहतुकीवरही झाला. ठाणे शहरात काल रात्री व बुधवारी पावसाने अचानक हजेरी लावली. तत्पूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे ठाणे शहरात १३ झाडे पडली.
तर बुधवारी सकाळपासून दुपारपर्यंत तब्बल १९ अशी एकूण ३२ झाडे पडल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. झाडे पडण्याबरोबरच ठाणे शहरात विविध तक्रारींचाही अक्षरशः पाऊस पडला. मंगळवारी रात्री पाऊण तासात २० मिमी तर बुधवारी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत २२ मिमी अवकाळी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून वातावरण बदलत असून पाऊस, गारपीट होत आहे. बुधवारी छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. अनेक गावांतील वीज खंडित झाली होती.
विजेची मागणी घटली
मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हवामानात गारवा निर्माण झाला. त्यामुळे ३० हजार मेगावॉटच्या घरात पोहोचलेली विजेची दैनंदिन मागणी बुधवारी आठ हजार मेगावॉटने कमी होऊन २२ हजार मेगावॉटपर्यंत खाली आली. त्यामुळे राज्यातील वीज केंद्रांना काहीशी विश्रांती मिळाल्याचे चित्र आहे.