महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ मे ।। भारतीय लष्कराने मंगळवारी मध्यरात्री केलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानची झोप उडालीय. पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानात असलेले दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. यानंतर पाकिस्तान भीतीच्या छायेखाली आहे. बिथरलेल्या पाकिस्तानी नेत्यांकडून पोकळ धमक्या दिल्या जात आहेत. दरम्यान, बुधवारी मध्यरात्री पाकिस्तानने हवाई हल्ल्यांच्या भीतीने लाहोर आणि इस्लामाबादमध्ये एअरस्पेस बंद केली. मंगळवारी रात्री झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी ४८ तासांसाठी उड्डाणे रद्द केली होती. आता एअरस्पेस बंद करण्याचा निर्णय घेतला. कराची एअरस्पेस मात्र सुरू आहे.
भारताने चूक केली
भारताने पाकिस्तानातल्या दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यानं पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी देशाला मध्यरात्री संबोधित केलं. भारताला या कारवाईचे परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही दिलीय. त्यांनी म्हटलं की, भारताने आदल्या रात्री जी चूक केली त्याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागेल.
आम्ही भारताला बॅकफूटवर ढकललं
शहबाज शरीफ म्हणाले की, आम्ही आपल्या देशाच्या संरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढू. तसंच पाकिस्तानने भारताला काही तासाताच प्रत्युत्तर देत बॅकफूटवर ढकलल्याचा दावाही शरीफ यांनी केला.
भारताच्या हल्ल्यातील मृतांना शरीफ म्हणाले, शहीद
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले की, भारताच्या कारवाईमुळे २६ जणांचा मृत्यू झाला. यात महिला आणि मुलांचाही समावेश आहे. ४० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. या मृतांना शरीफ यांनी शहीद असं संबोधलं आहे.
रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत मोजावी लागेल
भारताला रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत मोजावी लागेल. आम्हीही सिद्ध केलं की, चोख प्रत्युत्तर कसं द्यायचं हे पाकिस्तानला माहिती आहे. पाकिस्तानी लष्कराच्या शौर्याचा आणि बलिदानाचा आम्हाला अभिमान असल्याचं शहबाज शरीफ यांनी म्हटलं.