महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ मे ।। ‘‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील अडीच कोटी महिलांना दीड हजार रुपयांचे अनुदान दिले जात आहे. या योजनेचा विस्तार करताना लाभार्थी महिलांना बॅक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून रूपे कार्ड वितरित करण्यात येईल,’’ अशी घोषणा महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी केली.
नाशिक शहरातील पिंक रिक्षाची सेवा विमानतळावर उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. महाकवी कालिदास कलामंदिर येथे गुरुवारी जिल्हा परिषदेतर्फे महिलांसाठीच्या विविध योजनांचा तसेच जिल्हा महिला व बालविकास विभागामार्फत महिलांना ई-पिंक रिक्षाच्या वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी मंत्री तटकरे बोलत होत्या. व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आमदार हिरामण खोसकर, महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे आदी उपस्थित होते.
क्रेडिट कार्डप्रमाणे वापर
तटकरे म्हणाल्या, लाडकी बहिण योजनेला बळकटी देताना लाभार्थी महिलांना रूपे कार्ड वाटप केले जाणार आहे. त्याकरिता बँक ऑफ महाराष्ट्रासह अन्य काही बँकांशी सरकारने करार केले आहेत. महिलांना हे कार्ड क्रेडिट कार्डप्रमाणे वापरता येईल. मात्र, मद्य दुकाने व पानटपऱ्या येथे या कार्डच्या वापराला बंदी असेल.