महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ मे ।। ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी गुरुवारी (8 मे) एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत सरकारी विभागांना आवश्यक वस्तूंचा पुरेसा साठा ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, संपर्क यंत्रणा सुरळीत ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. लोकांमध्ये भीती पसरू नये, यासाठी उपाययोजना करण्याचेही आदेश देण्यात आले आहे. कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दीर्घ काळासाठी तयारी ठेवा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. त्याशिवाय, आवश्यक वस्तूंच्या किंमतीवर बारीक लक्ष ठेवण्यासही सांगितलं आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, पंतप्रधान मोदींनी सरकारी विभागांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या. आवश्यक वस्तूंच्या किंमती वाढू नयेत, यावर लक्ष ठेवा. लोकांनी गरजेपेक्षा जास्त खरेदी करू नये, यासाठी जनजागृती करा. ‘खोट्या बातम्या’ पसरवणाऱ्यांवर कारवाई करा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतही त्यांनी याच मुद्द्यांवर चर्चा केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी म्हणाले की, “ही तर फक्त सुरुवात आहे.” भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर हल्ला केल्यानंतर ही बैठक झाली.
या बैठकीत जवळपास २० सचिव सहभागी झाले होते. पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांच्या निर्देशांचे पालन करत निर्णय घेण्यास स्वतंत्र असतील. महत्त्वाच्या ठिकाणी आणि पायाभूत सुविधांचे संरक्षण करणे गरजेचं आहे. मंत्रालये आणि एजन्सी यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. यामुळे काम सुरळीत चालेल आणि संस्था अधिक सक्षम होतील.
सचिवांना त्यांच्या मंत्रालयातील कामकाजावर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. आवश्यक सिस्टममध्ये काही गडबड तर नाही, हे देखील तपसण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जेणेकरुन कुठल्याही प्रकारच्या सायबर हल्ल्यांपासून बचाव करता येईल.
ऑपरेशन सिंदूर | पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह
या बैठकीत अणुऊर्जा, अंतराळ, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान (IT), ग्राहक व्यवहार या विभागांचे सचिव सहभागी झाले होते. पायाभूत सुविधा क्षेत्रातील सचिव देखील उपस्थित होते. सर्व सचिवांनी आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी असलेल्या योजनांबद्दलची माहिती या बैठकीत दिली.