Sharad Pawar : साताऱ्यातुन शरद पवार मोठा निर्णय जाहीर करण्याचे संकेत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ मे ।। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेससोबत राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाने जावं, असा एक मतप्रवाह पक्षात असल्याची माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अशातच शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही नेते साताऱ्यात पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी रात्री सातारा सर्किट हाऊस येथे मुक्कामी आले होते. यशवंत विचारांच्या साताऱ्यात आज शरद पवार मोठा निर्णय घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शरद पवार यांनी आणखी एक गुगली टाकत केंद्रात विरोधी पक्षात बसायचं की नाही, याचा निर्णय सुप्रिया सुळे यांना घ्यावा लागेल, असे म्हटले होते. शरद पवार म्हणाले, एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया आणि अजित यांनी बसून ठरवावं. पक्ष उभा करताना आज बाजूला गेलेले सगळे एकत्र होते, त्यांच्या सगळ्यांची विचारधारा एकच आहे. त्यामुळे भविष्यात जर सगळे एकत्र आले, तर मला आश्चर्य वाटणार नाही, असं म्हणत शरद पवार यांनी राजकीय खळबळ माजवून दिली आहे.

त्यातच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त रयत शिक्षण संस्थेत आयोजित कार्यक्रमासाठी गुरुवारी सायंकाळी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, खासदार शरद पवार हे खासदार निलेश लंके यांच्या समवेत साताऱ्यात दाखल झाले. त्यांचा मुक्काम सातारा येथील जुन्या शासकीय विश्रामगृहात होता. यावेळी शरद पवार यांचे स्वागत दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले. यावेळी अनेक पदाधिकारी शरद पवार यांना भेटण्यासाठी विश्रामगृहावर दाखल झाले होते. शरद पवार सातारा मुक्कामी आल्यानंतर साताऱ्यातील वातावरण राष्ट्रवादीमय झाले होते.

शरद पवार हे साताऱ्यात दाखल झाल्यानंतर काही तासातच रात्री उशिरा अजित पवार हे शासकीय विश्रामगृहात दाखल झाले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अजित पवार यांचा मुक्काम नव्याने बांधण्यात आलेल्या विश्रामगृहात तर त्याच्या शेजारील जुन्या विश्रामगृहात शरद पवार यांचा मुक्काम राहिला. हे दोन्ही दिग्गज नेते साताऱ्यात दाखल झाल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने जाणते कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शरद पवार यांच्या विधानानंतर राज्यात एकच खळबळ माजल्याने अनेक नेत्यांच्या क्रिया प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या, अशातच आज दोन्ही नेते पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ अण्णा यांच्या ६६व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम एकत्र येत आहेत. त्याचबरोबर खासदार निलेश लंके खासदार सुप्रिया सुळे या सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत साताऱ्यात होईल की काय याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

आगामी चारच महिन्यांमध्ये होऊ घातलेल्या महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती व मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे नोटिफिकेशन काही दिवसात जाहीर होईल. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी पुन्हा एकदा हे दोन्ही नेते एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. जर या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली या निवडणूक लढवल्या जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामध्ये सुप्रिया सुळे यांची भूमिका ही महत्त्वाची राहणार असल्याचे जाणकार बोलत आहेत.

एकंदर, आज पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची पुण्यतिथीनिमित्ताने बहुतांश दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, खासदार, जिल्हा अध्यक्ष, पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आज या कार्यक्रमानंतर शरद पवार व अजित पवार एकत्र येऊन बंद खोलीत चर्चा होऊन मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष पदाबाबतही मोठा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. यशवंत विचारांच्या हा सातारा जिल्हा असल्याने या ऐतिहासिक राजधानी साताऱ्यातून संपूर्ण महाराष्ट्र त महाराष्ट्रातील राजकीय पटलावरचा मोठा निर्णय घोषित करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील महायुतीसह महाविकास आघाडीतील नेत्यांचे लक्ष आता साताऱ्याकडे लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *