महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० मे ।। देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वेस्टेशनवरील सुरक्षाव्यवस्था शुक्रवारी (दि. 9) अधिक कडक करण्यात आली. शुक्रवारच्या पहाटे पाकिस्तानने भारताच्या सीमावर्ती भागात अनेक हल्ले केले. मात्र, ते भारतीय सेनेने नाकामी केले. पाकिस्तानकडून आणखी हल्ले होण्याची शक्यता असल्यामुळे पुणे रेल्वेस्थानकावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
प्रवाशांची सुरक्षिततेसाठी आरपीएफने (रेल्वे सुरक्षा बल) अधिक कडक पाऊल उचलले. शुक्रवारी मध्य रेल्वे पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेशकुमार शर्मा, विभागीय वरिष्ठ रेल्वे सुरक्षा आयुक्त प्रियांका शर्मा यांच्यासह इन्स्पेक्टर सुनील यादव व अन्य रेल्वे अधिकारीवर्गाने पुणे रेल्वेस्थानकावर पाहणी करून येथील सुरक्षेचा आढावा देखील घेतला.
दरम्यान, शुक्रवारीच पुणे रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेची दै. ’पुढारी’कडून पाहणी करण्यात आली. त्या वेळी प्रवाशांच्या सामानाची आणि पार्सल विभागातील सामानाची कडक तपासणी केली जात आहे.
आरपीएफचे इन्स्पेक्टर सुनील यादव म्हणाले की, खबरदारीचा उपाय म्हणून स्टेशनवर आरपीएफ जवानांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. शिफ्टमध्ये वाढ करण्यात आली असून, 8 तासांची शिफ्ट आता 12 तासांवर करण्यात आली आहे.
महत्त्वाचे मुद्दे…
आरपीएफच्या बंदोबस्तात वाढ
बॅगेज स्कॅनर मशिन केल्या फुल अॅक्टिव्ह
प्रवाशांच्या सामानाची कसून तपासणी सुरू
हत्यारबंद रेल्वे सुरक्षा बलाची गस्त वाढवली
सिव्हिल ड्रेसमध्येही आरपीएफची गस्त