महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ मे ।। मुंबई व मुंबई परिसरात घर घेणे म्हणजे आता सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेले आहे. वनबीएचके घर घेण्यासाठीही आता कोट्यवधी रुपये मोजावे लागतात. सर्वसामान्यांना आता मुंबई महानगरात घर घेणे अवाक्याबाहेर गेले आहे. सर्वसामान्यांना महानगरात घर घेता यावे यासाठी म्हाडाकडून दरवर्षी लॉटरी जाहीर करण्यात येते. 2024मध्ये मुंबई मंडळासाठी लॉटरी जाहीर करण्यात आली होती. त्याचबरोबर आता कोकण मंडळासाठीही लॉटरी जाहीर करण्यात येणार आहे. जुलै महिन्यात कोकण मंडळाकडून कल्याण, ठाणे या शहरांत लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यामुळं नागरिकांचे लवकरच घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
जुलै महिन्यात म्हाडाच्या कोकण मंडळाकडून सुमारे चार हजार घरांची बंपर लॉटर काढली जाणार आहे. गेल्या दीड वर्षात म्हाडा कोकण मंडळाने तीन लॉटरी काढल्या असून सुमारे दहा हजार जणांना महानगरात घर घेता आलं आहे. आता जुलै महिन्यात पुन्हा एकदा सुमारे चार हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. पुन्हा एकदा हजारो नागरिकांचे स्वप्न साकार होणार आहे. यात म्हाडाने चितळसर येथे उभारलेल्या 1173 घरांसह हाउसिंग स्टॉकमधून म्हाडाला मिळालेल्या घरांचादेखील समावेश असणार आहे. तर, कल्याण येथेही म्हाडाला अडीच हजार घरेदेखील मिळणार आहेत. त्यामुळं म्हाडाची सर्वाधिक घरे ठाणे आणि कल्याणमध्ये आहेत.
म्हाडाकडून पाच हजार घरांची लॉटरी
2025मध्येही म्हाडा मुंबई मंडळात पाच हजार घरांची लॉटरी काढणार आहे. दिवाळीआधीच लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात म्हाडाने पुढील वर्षभरात मुंबईसह राज्यात 19,496 घरं बांधणीचे उद्दिष्ट ठेवलं आहे. त्यातूनच मुंबईत 5199 घरं बांधली जाणार आहे. तसंच, मुंबईसह पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर आणि कोकणात 19 हजार 497 सदनिकांचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.