राज्यात ‘या’ मुहूर्तावर मान्सून ; तत्पूर्वी होणार वादळी पाऊस अन् अवकाळीचा मारा…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ मे ।। अंदमान आणि निकोबार बेटांवर (Monsoon 2025) मान्सूनच्या आगमानास सुरुवात झाली असून, या वाऱ्यांचा एकंदर वेग पाहता यंदाच्या वर्षी केरळात हे वारे मे महिन्यातच दाखल होणार असल्याचा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मान्सूनचं आगमन ठरल्याप्रमाणं होत असतानाच इथं महाराष्ट्राच मात्र हवामान बदलानी नागरिकांच्या आणि प्रामुख्यानं बळीराजाच्या चिंतेत भर टाकली आहे.

पुढील 24 तासांसाठी राज्याच्या पश्चिम, मध्य आणि विदर्भ क्षेत्रातील काही भागांना वादळी पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. या भागात गारपिटीचाही तडाखा बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्यानं सातारा आणि कोल्हापूर इथं जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, पुण्यात आकाश अंशत: ढगाळ असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

अरबी समुद्राच्या मध्यापासून ते थेट गुजरातपर्यंत आणि मराठवाडा ते तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याच कारणानं मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्गातही आकाश झाकोळलेलं दिसून येत आहे. तर, छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भाच्या बहुतांश भागांवरही या वादळी पावसाची वक्रदृष्टी असेल असा स्पष्ट इशारा हवामान विभागानं देत नागरिकांना सतर्क केलं आहे.

मान्सूनची वाटचाल…
देश स्तरावर केंद्रीय हवामानशास्त्र विभागानं जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश या भागांसह उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यादरम्यान ताशी 50 ते 60 किमी इतक्या वेगानं वारे वाहतील असाही इशारा देण्यात आला आहे. देशाच्या दक्षिणेकडे 11 ते 15 मे दरम्यान मान्सूनपूर्व पाऊस जोर धरणार असून, त्यामुळं तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशी राज्य प्रभावित होतील.

सध्या मोसमी वारे निकोबार बेटांवर दाखल झाले आहेत. ज्यामुळं 27 मेपर्यंत मान्सून केरळ किनारपट्टीवर पोहोचणार असल्याचं चित्र दिसत आहे. मुख्य म्हणजे मागील 17 वर्षांत प्रथमच मान्सून 4 दिवस आधी केरळात येणार असून, 6 जूनपासून मान्सूनचा महाराष्ट्रातील प्रवास सुरू होण्यास पोषक वातावरण पाहायला मिळत आहे. ज्यामुळं यंदा तीन दिवस आधीच मान्सून राज्यात दाखल होईल. तत्पूर्वी मात्र वादळी पाऊस आणि गारपीटसदृश्य वातावरणामुळं मान्सूनची पार्श्वभूमी तयार होईल असं म्हणणं गैर नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *