महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ मे ।। भारतात आयफोनचे उत्पादन करणे थांबवा आणि अमेरिकेतच आयफोन तयार करा, असा आग्रह अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपलचे सीईओ टिम कूक यांच्याकडे गुरुवारी धरला. ते दोहा येथे बोलत होते. मात्र अॅपल भारतातील उत्पादनाची फळे चाखणे सुरू ठेवण्यावर ठाम राहिल्याचे सूत्रांनी सांगितले.
अॅपल कंपनी अमेरिकेत स्मार्टफोन तयार करत नाही. कंपनीचे सध्या बाजारात असलेले बहुतांश आयफोन चीनमध्ये तयार झालेले आहेत. अॅपल तयार करत असलेल्या एकूण आयफोनच्या सुमारे 15 टक्के आयफोनची निर्मिती भारतातील कारखान्यात केली जाते. म्हणजेच सुमारे चार कोटी आयफोन भारतात तयार होतात. डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर स्थानिक पातळीवर वस्तूनिर्मितीला चालना देण्याचे ठरवले आहे. अॅपल अमेरिकेतील उत्पादन वाढवेल, असे त्यांनी जाहीरही करून टाकले आहे.
भारतात तयार झालेल्या आयफोनची जुळणी तमिळनाडू येथे तैवानी कंपनी फॉक्सकॉन करते. त्याचप्रमाणे पेगॅट्रॉन कॉर्पोरेशनचे कामकाज भारतात सुरू ठेवणारी टाटा इलेक्ट्रॉनिक्स ही आयफोनची निर्मिती करणारी दुसरी कंपनी आहे. टाटा आणि फॉक्सकॉन या दोन्ही कंपन्या आपल्या प्रकल्पांत आयफोन निर्मितीची क्षमता वाढवत आहेत. फॉक्सकॉनने खास निर्यातीसाठी तेलंगण येथील कारखान्यात अॅपल इयरपॉडची निर्मिती सुरू केली आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षात अॅपलने भारतात 60 टक्क्यांहून अधिक आयफोनची जुळणी केली. या आयफोनची एकूण किंमत 22 अब्ज डॉलर आहे.
भारताकडून चौकशी
ट्रम्प यांच्या विधानाची गंभीर दखल घेऊन केंद्र सरकारी अधिकाऱ्यांनी अॅपल कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. भारतातील गुंतवणुकीचे बेत अॅपल कंपनीने बदललेले नाहीत, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अॅपलसाठी येत्या काळात भारत आयफोनसह विविध उत्पादनांचे महत्त्वाचे केंद्र असेल, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘यू आर माय फ्रेंड’
दोहा (कतार) येथे ट्रम्प म्हणाले, ‘आदल्या दिवशी माझा आणि टिम कूक यांचा थोडा वाद झाला. मी त्यांना सांगितले, टिम, तुम्ही माझे मित्र आहात. मी तुम्हाला चांगली वागणूक देतो. तुम्ही अमेरिकेत 500 अब्ज डॉलरची गुंतवणूक घेऊन आलात. परंतु तुम्ही तुमची उत्पादने भारतात तयार करता असे मी ऐकतो आहे. तुमची उत्पादने भारतात तुम्ही तयार करावीत हे मला मान्य नाही.’ अॅपलने आगामी चार वर्षांत अमेरिकेत 500 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचे आश्वासन यावर्षीच्या सुरुवातीला दिले होते. त्याचा संदर्भ घेऊन ट्रम्प यांनी अमेरिकेत अॅपल कंपनी तिचे उत्पादन वाढवणार असल्याचे सांगितले. मात्र यापेक्षा अधिक तपशील त्यांनी दिला नाही.