महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ मे ।। ‘मायक्रोसॉफ्ट’च्या संशोधकांनी विकसित केलेले ‘ऑरोरा’ हे फाऊंडेशनल एआय मॉडेल, जे हवामानाचा अचूक अंदाज वर्तविण्यासाठी ओळखले जाते, आता हवेची गुणवत्तादेखील अत्यंत वेगाने आणि अचूकतेने सांगेल, अशी माहिती कंपनीने अलीकडेच त्यांच्या ब्लॉग पोस्टद्वारे दिली आहे.
‘ऑरोरा’ आधीपासूनच वादळ, चक्रीवादळ यांसारख्या हवामानाच्या घटकांचा अंदाज वर्तविण्यात कुशल आहे, पण आता हे मॉडेल पारंपरिक हवामान मर्यादांपलीकडे जाऊन, म्हणजेच वायू प्रदूषणासारख्या समस्यांबाबतचे भाकित करण्यासही सक्षम झाले आहे. मायक्रोसॉफ्टने सांगितले की, हे मॉडेल प्रथम मोठ्या व विविध डेटा सेटस्मधून सामान्य ज्ञान मिळवते आणि नंतर विशिष्ट व लहान डेटा वापरून त्याचा अधिक परिष्कृत वापर केला जातो. 10 लाख तासांचा डेटा, सॅटेलाइटस्, रडार्स आणि वेधशाळा ‘ऑरोरा’ला प्रशिक्षित करण्यासाठी वापरले गेले.
हे मॉडेल एन्कोडर आर्किटेक्चर वापरते, जे विविध स्रोतांमधून मिळालेला डेटा एका मानक स्वरूपात रूपांतरित करते. त्यामुळेच हे ‘एआय’ मॉडेल अचूक व तात्काळ अंदाज देऊ शकते. ‘ऑरोरा’चा स्रोत कोड आणि मॉडेल वेटस् आता सार्वजनिकरित्या उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या मॉडेलचे एक विशेष संस्करण, जे प्रती तास हवामानाचा (उदा. ढगांची स्थिती) अंदाज देतो, तो आता MSN Weathe अॅपमध्ये एकत्रित करण्यात आलेला आहे. ‘ऑरोरा’ हे केवळ हवामानाचे नाही, तर आता वायू गुणवत्तेचेही भविष्यदर्शन देणारे बहुउद्देशीय AI मॉडेल बनले आहे. या तंत्रज्ञानामुळे नागरिक आरोग्य, शहरी नियोजन, शेती व आपत्कालीन व्यवस्थापनासाठी उपयोग होणार आहे.