Monsoon 2025 : मॉन्सूनचा वेग जूनमध्ये मंदावणार, राज्यासह देशात पाऊस दडी मारण्याचा अंदाज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ मे ।। नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी यंदा वेगाने वाटचाल करत देशात लवकर आगमनाचा एक नवा विक्रम रचला. मे महिन्यात कोसळलेला पाऊस देखील उच्चांकी नोंद करण्याच्या मार्गावर आहे. मात्र प्रवाह मंदावल्याने त्याची पुढील चाल अडखळणार आहे. पुढील दोन आठवडे विशेषतः जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यासह देशात पाऊस दडी मारण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

यंदा अंदमान, निकोबार बेटांसह, केरळ आणि महाराष्ट्रात मॉन्सूनने अतिशय वेगाने प्रगती केली. साधारणतः जूनमध्ये पोहोचणाऱ्या मॉन्सूनने यंदा मे महिन्यातच महाराष्ट्रासह देशाच्या बऱ्याच भागात मजल मारली आहे. मॉन्सूनने दक्षिण भारतासह महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, ईशान्येकडील राज्ये आणि सिक्कीम, पश्चिम बंगालच्या काही भागांपर्यंत धडक दिली आहे. मॉन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी मात्र वाट पाहावी लागण्याची चिन्हे आहेत. पूर्वमोसमी पावसाने मे महिन्यात तडाखा दिला.

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेली कमी दाबाची क्षेत्रे, उत्तर भारतातील पश्चिम चक्रावातांचा मध्य भारतापर्यंत दिसून आलेला प्रभाव यातच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून झालेला बाष्पाचा पुरवठा यामुळे मे महिन्यात महाराष्ट्रासह देशात प्रथमच विक्रमी पाऊस कोसळला.

शुक्रवारपर्यंत (ता. ३०) देशासह महाराष्ट्रात आतापर्यंतच्या सर्वांत उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात सरासरी तब्बल १७२.६ मिलिमीटर, तर देशभरात सरासरी १७५.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. महिनाअखेर या आकडेवारीत आणखी वाढ होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *