महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ मे ।। मुंबई-गोवा महामार्गाचे काम तब्बल १२ वर्षांपासून जास्त काळ रखडले आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम २०२५ मध्ये पूर्ण करण्यात येणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, ५ महिने पूर्ण होत आली असली तरी डिसेंबर २५ पर्यंत पूर्णत्वास जाईल अशी शकता दिसुन येत नाही असे असले तरी २०२५ या वर्षात मुंबई-गोवा महामार्गाबाबत सर्वात मोठी अपटेड समोर आली आहे, ती म्हणजे मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील दोन्ही बोगद्यामधून वाहतूक सुरू करण्यात आली असल्याने प्रवाशी वर्गाला दिलासा मिळाला असला तरी कशेडी बोगद्यापासून काही मीटरच्या अंतरावर खेड बाजूला दरडी कोसळत आहेत.
बोगद्यात देखील अद्याप प्रकाश योजनेचे काम प्रगती पथावर आहे. त्यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. परिणामी वाहनचालकांना त्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. याकडे तातडीने राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
कशेडी बोगद्याचे दोन्ही टोक गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. बोगदा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यामुळे प्रवाशांचा प्रवास वेगवान व सुसह्य झाला आहे. मात्र गोव्याकडे जाण्यासाठी असलेल्या बोगद्यापासून काही अंतरावर पुलाचे काम अर्धवट असल्याने वाहतूक वळवण्यात आली आहे. मात्र तेथून पुढे दुपदरी रस्त्यावर ज्या भागात वाहने वळतात तिथूनच काही मीटर अंतरावर दरडी कोसळू लागल्याने ही सुखद अनुभूती आता धोकादायक ठरू लागली आहे. गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पावसाचे प्रमाण अधिक आहे. सोमवारी रात्रीपासून रस्त्यावर माती व दगड कोसळल्याचे निदर्शनास आले आहे. या भागात पुरेसे पथदीप नसून राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने सुरक्षेचा उपाय म्हणून येथे केवळ बॉरगेट लावले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. कशेडी घाटात रस्त्याचे चौपदरीकरण शक्य नसल्याने व पावसाळ्यात या मार्गिकवर दरडीची टांगती तलवारसह भोगाव जवळ रस्ता खचण्याची वार्षिक परंपरा आहे. घाटात ३.४४ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्याचे काम रिलायन्स इन्फास्ट्रक्चर कंपनीने घेतले होते.
प्रवास आता आरामदायी
नैसर्गिकदृष्टय़ा धोकादायक आणि त्यातच सातत्याने होणारे अपघात, अवजड व रसायनवाहू वाहनांची डोकेदुखी यामुळे खडतर झालेला मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील प्रवास आता आरामदायी व कमी वेळेचा होत आहे.
या बोगदाचे काम करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तीन पदरी करण्यात आला असून, दोन भुयारी बुमर तंत्रज्ञानच्या साह्याने करण्यात आले त्यातील करारानुसार ७.२ किलोमीटर लांबीचा आधुनिक दर्जाचा पक्का करण्यात आला. या दोन्ही भुयारी मार्गात आपत्कालात उपयुक्त असलेले वायूविजन सुविधेचे एक भुयारही यात समाविष्ट आहे. पोलादपूर बाजूच्या पहिल्या अर्धा किलोमीटरच्या टप्प्यात दोन्ही भुयारी मार्गाना जोडणाऱ्या कनेक्टिव्हिटीचा भुयारी मार्ग तयार करण्यात आला त्याच प्रमाणे आतील भागात परत यू टर्न घेणाऱ्या वाहनांसह अपघातग्रस्त वाहनांना बाहेर काढण्याची सुविधा या कनेक्टिव्हिटी भुयारी मागनी करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामधील खेड तालुक्यातील खवटी येथून २०१९ च्या पावसाळयापूर्वीच भुयारी मार्गाचे काम सुरू झाले. ते जवळपास २०२५ च्या मे पर्यंत ९० टक्के पूर्णत्वास गेले आहे. या भुयारी मार्गिकेमुळे प्रवास सुसाट व सुखाचा होत आहे.