Ladki Bahin Yojna: लाडकी बहिण योजनेचा ‘या’ महिलांना घेता येणार नाही लाभ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ मे ।। राज्यसरकारची ‘लाडकी बहीण’ ही योजना सुरुवातीपासूनच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेचा विषय ठरली आहे. या योजनेला राज्यभरातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान ही योजाना सुरू करताना या संदर्भात सरकारनं काही अटी घातलेल्या होत्या, मात्र या अटीमध्ये न बसणाऱ्या महिला देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेताना दिसून येत आहेत, या संदर्भात आता शासनानं मोठा निर्णय घेतला आहे.

अटीत न बसणाऱ्या महिलांचे अर्ज होणार बाद
लाभार्थी महिलांच्या अर्जाची फेर पडताळणी करण्यात येत आहे, ज्या महिला या योजनेच्या अटींमध्ये बसत नाहीत त्यांचा अर्ज बाद ठरवला जात आहे, त्यांना या योजनेतून वगळण्यात येत आहे. अनेक महिलांचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त असताना तसेच नावावर घर आणि चारचाकी वाहन असताना देखील काही महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं दिसून आलं आहे, या महिलांची नावं या योजनेतून वगळण्यात येत आहेत. धक्कादायक म्हणजे चक्क सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती आता समोर आली आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

आदिती तटकरे यांनी ट्वीट करून दिली माहिती
“लाभार्थ्यांची पडताळणी” ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण व नियमित प्रक्रिया आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीतही ही प्रक्रिया राबवली जाते. या प्रक्रियेत सेवार्थ मधील जवळपास २ लाख अर्जांची पडताळणी केल्यानंतर त्यात सुमारे २२८९ सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी केल्याची बाब जानेवारी- फेब्रुवारी दरम्यानच लक्षात आली असून तेव्हापासून अशा व्यक्तींना कोणताही लाभ वितरित करण्यात आलेला नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांनाच देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, यासाठी अर्जांची पडताळणी ही नियमितपणे चालणारी प्रक्रिया असणार आहे’. असा ट्विट आदिती तटकरे यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *