Pandharpur News: भाविकांसाठी आनंदाची बातमी! ‘विठ्ठल दर्शनातील वशिला आता बंद’; पंढरपुरात मंदिर समितीचा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ जून ।। पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर समितीने वशिल्याने आधी दर्शन हा प्रकार बंद करण्याचा निर्णय घेतला असून सोमवारपासूनच (ता. ९) याची अंमलबजावणी केली जाणार आहे. या निर्णयामुळे सामान्य भाविकांना सुलभपणे व लवकर दर्शन मिळण्याची सोय होणार आहे.

दर्शन रांगेतील भाविकांचे जलद गतीने व सुलभपणे विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन व्हावे यासाठी वशिल्याचे दर्शन बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयाचे वारकरी संप्रदाय मधून स्वागत केले जात आहे. विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दररोज जवळपास एक लाखाहून अधिक भाविक सध्या दर्शनासाठी पंढरपूर मध्ये येतात. अनेक भाविक दर्शन रांगेतून विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतात.

दरम्यान अनेक लोकांना वसलेल्याचे दर्शन घडविले जाते. यामुळे दर्शन रांग रखडते. ही बाब मंदिर समितीच्या लक्षात आल्यानंतर मंदिर समितीने उद्यापासून वशिल्याचे दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी परिपत्रक काढले आहे. आषाढी यात्रेच्या निमित्ताने आत्तापासूनच पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर समितीच्या या निर्णयाचे सर्वसामान्य भाविकांमधून स्वागत केले जात आहे.

दरम्यान मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी वशिल्याचे दर्शन दिल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही या परिपत्रकातून देण्यात आला आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष, सदस्य आणि कार्यकारी अधिकारी यांच्या परवानगीशिवाय यापुढे कोणालाही मंदिरात दर्शनासाठी सोडले जाणार नाही असा लेखी आदेश कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढला आहे.

सदस्यांना ही सवलत नकोच
मंदिर समितीने वशिल्याचे दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी सदस्यांना मात्र यामधून सूट दिल्याचे समोर आले आहे. विठ्ठल मंदिर समितीच्या सदस्यांची परवानगी असेल तर वशिल्याचे दर्शन दिले जाईल, असे यातून स्पष्ट दिसते. त्यामुळे सदस्यांनाही वशिल्याचे दर्शन देता येणार नाही. यासाठीही मंदिर समितीने ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *